

बामणोली : जागतिक वारसा स्थळ लाभलेले कास पुष्प पठार व ठोसेघर, चाळकेवाडी, सज्जनगड परिसर पर्यटकांनी ओव्हरफ्लो झाला. वीकेंडमुळे कासवरील भुशी डॅमसद़ृश नजारा पाहण्यासाठी व येथील अल्हाददायक वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी तोबा गर्दी झाली. ठोसेघर, केळवली, सांडवली, भांबवली वजराई धबधब्यावरही अलोट गर्दी उसळली.
कास पठारासह ठोसेघर, चाळकेवाडी परिसरातील निसर्गाचे रूपडे पर्यटकांना खुणावू लागले आहे. पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी या परिसरात भुरभुरणारा पाऊस, बोचरी थंडी, दाट धुके व अल्हाददायक वातावरण पर्यटकांना आकर्षित करत आहे. रविवारी हा परिसर पर्यटकांनी तुडुंब भरून गेला. ठोसेघरसह केळवली, सांडवली, भांबवली वजराई हे धबधबे फेसाळले आहेत. त्यामुळे रविवारी पर्यटकांची पावले या धबधब्याकडे वळली. कास पठारावरील फुलांच्या हंगामाला अद्याप अवधी असला तरी निसर्गाचे रूप न्याहळण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. कास तलावाच्या सांडव्यावरून वाहणार्या पाण्यामुळे त्या ठिकाणी भुशी डॅमसारखा नजारा तयार झाला आहे.
हाच नजारा पाहण्यासाठी पर्यटक या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. सांडव्यावरून वाहणार्या पाण्यामध्ये पर्यटक लहान मुलांसह स्वतः जाऊन पाण्यामध्ये भिजण्याचा आनंद लुटत आहेत. येथील गर्दी पाहता त्या ठिकाणी सुरक्षिततेची देखील काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे. काससह या संपूर्ण परिसरामध्ये असणारे पर्यटनाचे ठिकाण वजराई धबधबा, एकीवचा धबधबा, मुनावळे येथील केदारेश्वर धबधबा, यासह बामणोली, शेंबडी, मुनावळे येथील बोटिंग या सर्व ठिकाणी पर्यटक पावसाळी पर्यटनासाठी गर्दी करू लागले आहेत.
गेले चार ते पाच दिवस पावसाने उघडीप दिल्याने कास-ठोसेघर परिसरात पर्यटकांचे लोंढे वाढायला सुरुवात झाली आहे. त्यात मे महिन्यापासून पडणार्या पावसामुळे शिवसागर जलाशय देखील भरल्याने त्या ठिकाणीदेखील पर्यटक बोटिंगसाठी आता गर्दी करून लागले आहेत.
या परिसरामधील विनायकनगर, शेंबडी, वाघळी हे देखील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे. या ठिकाणी देखील पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत.