Kas Plateau: कास पठार पर्यटकांनी फुलू लागले

विकेंडला होतेय गर्दी : हंगामाच्या पहिल्याच शनिवारी तीन हजारांहून अधिक पर्यटकांची भेट
Kas Plateau: कास पठार पर्यटकांनी फुलू लागले
Published on
Updated on

बामणोली : जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पुष्प पठारावरील फुलांचा हंगाम १ सप्टेंबर रोजी सुरू झाला. त्यानंतर कास पठाराकडे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.

सप्टेंबर महिन्याचा पहिलाच शनिवार आणि ऑनलाइन बुकिंग सुरू झाल्याने शनिवारी तब्बल अडीच हजार पर्यटकांनी ऑनलाइन बुकिंग करून कास पुष्प पठारावरील दुर्मीळ फुलांचा आनंद लुटला. तर एक हजारांहून अधिक पर्यटकांनी प्रत्यक्ष पठारावर येऊन ऑफलाइन तिकीट काढले. त्यामुळे शनिवारी साधारणपणे तीन हजारांहून अधिक पर्यटकांनी कास पठाराला भेट देत फुलांचा आनंद घेतला.

पठारावर सध्या सर्वत्र चवर फुलांनी पर्यटकांचे लक्ष वेधून घेतले आहे. तसेच सातारी वाय तुरा, सितेची आसवे, गुलाबी तेरडा, सोनकी, गेंद यांसह विविध फुले उमलू लागली असून ती पर्यटकांना आकर्षित करत आहेत.

शनिवार सुट्टीचा दिवस असल्याने सकाळच्या सत्रात येणाऱ्या वाहनांसाठी कास तलावाकडील पार्किंगमध्ये व्यवस्था करण्यात आली होती. हे पार्किंग पूर्ण भरल्यानंतर उर्वरित वाहने कासाणी येथे करण्यात आलेल्या पार्किंगच्या जागेत उभी करण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे, कास पुष्प पठार परिसरात पावसाने उघडीप दिल्याने फुले उमलण्यास पोषक वातावरण निर्माण झाले आहे.

गणेशोत्सवानंतर कास पठारावर फुलांचे गालिचे

सद्यस्थितीत पठारावर पावसाने उघडीप दिल्याने ऊन पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे तेरडा (गौराईची फुले) उमलू लागला आहे. गणेशोत्सव आणि त्यानंतरच्या काळात गुलाबी, पांढऱ्या, निळ्या आणि पिवळ्या फुलांचे आकर्षक गालिचे पर्यटकांना कास पठारावर पाहायला मिळणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news