

सातारा : सातार्याची प्रमुख जलजीवन वाहिनी असलेल्या कास धरणात 60 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे गेल्यावर्षीसारखे पाणी कपातीचे संकट टळले आहे. सातारकरांसाठी ही दिलासादायक बाब ठरली. कास धरणाची उंची वाढवल्यामुळे सातारकरांना मुबलक पाणी मिळण्यास मदत झाली आहे.
कास धरणाची उंची वाढवण्यात आल्याने धरणाची पाणी साठवण क्षमता आता 0.5 टीएमसीपर्यंत वाढली आहे. मागील वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे हे धरण लवकर भरले. विशेष म्हणजे, धरण पाणलोट क्षेत्रातून येणारा पाण्याचा प्रवाह डिसेंबर-जानेवारी महिन्यापर्यंत सुरूच राहिला. त्यामुळे धरणातील पाणीपातळी दीर्घकाळ टिकून राहिली, हे सध्याच्या पाणीसाठ्याचे मुख्य कारण आहे. मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी सध्याच्या स्थितीचा आढावा घेत पाणी वितरण व्यवस्थेचे नियोजन प्रभावीपणे करण्याच्या सूचना पाणीपुरवठा अभियंता शहाजी वठारे यांना दिल्या आहेत.
धरणामध्ये सध्या समाधानकारक पाणी उपलब्ध असल्यामुळे पाणीपुरवठा विभागाने तात्पुरते कोणतेही पाणीबचतीचे धोरण आखलेले नाही. मात्र, काही भागांमध्ये पाईपलाईनची दुरूस्ती सुरू असल्यामुळे तिथे पाणीपुरवठा विस्कळीत राहतो. मात्र, या भागात नागरिकांच्या सोयीसाठी वाहतूक विभागाच्यावतीने टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्याचबरोबर महादरे तलाव कोरडा पडत चाललल्यामुळे व्यंकटपुरा पेठ, चिमणपुरा पेठ, रामाचा गोट आणि मेहंदळे बोळ परिसरातील एकवेळचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. या ठिकाणी आता कास योजनेतून अधिक पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे. सातार्यातील पाण्याची स्थिती सध्या समाधानी असली तरी नागरिकांच्या सजगतेची गरज आधिक आहे.