Kas Plateau: कास फुलोत्सवास उद्यापासून प्रारंभ

दिवसाला ३ हजार पर्यटकांना प्रवेश: सुट्टीच्या दिवशी ऑनलाईन बुकिंग अनिवार्य
Kas Plateau
Kas Plateau
Published on
Updated on

बामणोली : जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या कास पुष्प पठारावरील यंदाच्या फुलोत्सवाला मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. पठारावर चवर फुलले असून तेरडा, सीतेचे आसवे, गेंद, नभाळी, आभाळी कंदील पुष्प, कुमोदिनी फुलांचा बहर दिसू लागला आहे. पर्यटकांची वाढती गर्दी आणि फुलांचे संवर्धन लक्षात घेऊन यंदा दररोज केवळ ३ हजार पर्यटकांनाच ऑनलाईन प्रवेश दिला जाणार आहे. शनिवार, रविवार तसेच सरकारी सुट्टीच्या दिवशी ऑनलाईन बुकिंग केलेल्या पर्यटकांनाच प्रवेश मिळणार असून, थेट येणाऱ्या पर्यटकांना प्रवेश दिला जाणार नाही.

फुलोत्सवासाठी पर्यटकांना www.kas.ind.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन बुकिंग करता येणार आहे. १२ वर्षांवरील पर्यटकांसाठी प्रतिव्यक्ती २०० रुपये प्रवेश शुल्क निश्‍चित केले आहे. यामध्ये पार्किंगच्या ठिकाणापासून पठारापर्यंतची बससेवा मोफत असणार आहे. प्रत्येक ग्रुपला परिसराची माहितीपत्रिकाही देण्यात येणार आहे. एकीव वॉच टॉवरवरील दुर्बिणीतून कण्हेर जलाशय व परिसराचे विहंगम दृश्य पाहता येणार आहे. तसेच कुमुदिनी तलाव वॉच टॉवरवरून कास तलाव परिसराचे दर्शन घेता येणार आहे.

मंडपघळ ठरणार नवे आकर्षण

कास पठारासोबतच परिसरातील अन्य नैसर्गिक स्थळांकडे पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न यंदा करण्यात येत आहे. त्यामध्ये मंडपघळ हे प्रमुख आकर्षण ठरण्याची शक्यता आहे. दऱ्याखोऱ्यांचे विहंगम दृश्य, निसर्गसौंदर्य आणि जैवविविधतेमुळे मंडपघळ पर्यटकांचे लक्ष वेधून घेणार आहे. दरम्यान, कास पठारावर येणाऱ्या पर्यटकांनी फुलांचे संवर्धन करावे, फुलांमध्ये प्रवेश करू नये, तसेच परिसरात स्वच्छता राखावी, असे आवाहन सातारा वन विभाग आणि कास पठार सहा गाव संवर्धन समितीने केले आहे.

प्रवेश, सुविधांचे दर

१२ वर्षांवरील पर्यटक : २०० रुपये

शालेय सहल : ४० रुपये प्रतिविद्यार्थी

गाईड : १० जणांच्या ग्रुपसाठी २०० रुपये प्रतितास

इलेक्ट्रिक वाहन : १०० रुपये प्रतिव्यक्ती

दैनिक ऑनलाईन प्रवेश मर्यादा : ३ हजार पर्यटक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news