

बामणोली : जागतिक वारसास्थळ असणार्या कास पठावरावर फुलांचा हंगाम सुरू झाला आहे. हंगामातील दोन आठवड्यांचा कालावधी उलटल्यानंतर कासच्या फुलोत्सवाला पर्यटकांचा बहर येवू लागला आहे. प्रामुख्याने शनिवार आणि रविवारी पर्यटकांचे लोंढेच्या लोंढे कासकडे धाव घेत आहेत. रविवारीही पर्यटकांनी तोबा गर्दी केली होती. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे काही काळ पर्यटकांना ताटकळावे लागले.
कास पठार विविध दुर्मिळ फुलांनी बहरले आहे. प्रशासनाने हंगाम सुरू केल्यानंतर पर्यटकांचा ओढा वाढू लागला आहे. खासकरून शनिवार आणि रविवारी या सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची वर्दळ वाढू लागली आहे. पावसाने विश्रांती घेतल्याने कासचा हंगाम आता बहरात आला आहे. पर्यटकांची गर्दी होत असली तरी कास पठार कार्यकारी समितीकडून सेवा सुविधा पुरवण्यात येत आहे. या गर्दीतही पर्यटक फोटोसेशन करत आहेत.
रविवारी सकाळी सातारा शहरामध्ये जागतिक दर्जाची सातारा हाफ हिल मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामुळे सातारा ते कास या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. रविवारी कास पुष्प पठार पाहण्यासाठी 2 हजार 700 पर्यटकांनी ऑनलाईन बुकिंग केले होते. तर पाच हजारहून अधिक पर्यटकांनी ऑफलाईन कास पठारावर हजेरी लावली होती. मोठ्या संख्येने पर्यटक आल्याने दिवसभर कासकडे जाणार्या रस्त्यावर वाहनांची वर्दळ होती.
कास पठार कार्यकारी समितीचे चेक पोस्ट घाटाई फाट्यापासून सातार्याच्या बाजूला साधारणपणे चार ते पाच किमीपर्यंत लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तर वनविभाग सातारा व कास पठार कार्यकारी समिती यांनी केलेले नियोजन या गर्दीच्या पुढे तोकडे पडत होते. कासानी व कास तलावाजवळील पार्किंग बाराच्या अगोदरच फुल झाल्याने पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. गर्दी वाढल्याने अनेक पर्यटकांना फुलेच पाहता आली नाहीत.
वन विभाग कर्मचारी व कास समिती सदस्य उतरले रस्त्यावर
वाहनांच्या लांबच लांब रागा लागल्यानंतर वनविभागाचे रोहोट वनपाल राजाराम काशीद यांनी कार्यकारी समितीच्या चेक पोस्ट जवळच ठिय्या मांडला. येथे मुख्य रस्त्यामध्ये उभे राहून वॉकीटॉकीच्या माध्यमातून तसेच येणार्या वाहनांना दिशा दाखवून ट्रॅफिक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या जोडीला वनविभागातील इतर कर्मचारीही सहकार्य करत होते. त्यामुळे कास कार्यकारी समितीचे सदस्य रस्त्यावर उतरून चालकांना मार्ग दाखवत होते.