

कराड : कराड - ढेबेवाडी मार्गावरील शिंदेवाडी फाटा (ता. कराड) येथील गोल्ड लीफ फूड प्रॉडक्ट्स या नूडल्स उत्पादन करणाऱ्या फॅक्टरीला शनिवारी पहाटे भीषण आग लागली. या दुर्दैवी घटनेत मोठे आर्थिक नुकसान झाले असून ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. या आगीत फ्राय हायड्रॉलिक मशीन, भट्टी, मिक्सर, कुलर तसेच तयार मालासह कच्च्या मालाचे मोठे नुकसान झाले आहे.
सागर आत्माराम पाटील (रा. नांदगाव, ता. कराड) यांनी दिलेल्या पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ते गेल्या चार वर्षांपासून या कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत असून कंपनी त्यांच्या पत्नी व गौरी मंगेश शिंदे यांच्या नावे आहे. फॅक्टरीमध्ये 12 कामगार काम करतात. पहाटे 3.10 वाजता नाईट शिफ्टमधील कामगार अक्षय विलासन (रा. तुळसण) यांनी पाटील यांना आग लागल्याची माहिती दिली. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास फ्राय हायड्रोलिक मशीनमध्ये शॉर्टसर्किट होऊन ठिणग्या उडाल्या. त्या ठिणग्या जवळील तेलाच्या कढईत पडल्याने कढईत मोठा भडका उडाला. कामगारांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र ज्वाळा वाढतच गेल्या. यात भट्टी, मिक्सर, कुलर, स्टार्टर, फॅन, एमसीबी बोर्ड, विद्युत वायरिंगसह तयार आणि कच्चा माल, तेल, मैदा तसेच शेडवरील पत्रे जळून खाक झाले.
घटनेची माहिती मिळताच सागर पाटील आणि त्यांचे मित्र मंगेश शिंदे घटनास्थळी धावले. अग्निशामक दलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोन लागला नाही. त्यामुळे फॅक्टरीतील उपलब्ध अग्निशामक यंत्रे व पाण्याच्या साहाय्याने आग नियंत्रणात आणण्यात आली. आग पूर्णपणे शांत झाल्यानंतर सुमारे 6 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आल्याचे पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये नमूद करण्यात आले आहे.