

मे महिन्यात कराड तालुक्यातील अनेक गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. विशेष करून मसून पूर्व भाग व दक्षिणमधील डोंगरी गावांना टंचाईच्या झळा सोसाव्या लागतात. या उन्हाळ्यात तालुक्यातील 27 गावात टंचाई सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. टंचाई निवारणासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने टंचाई आराखड्याच्या अनुषंगाने उपायोजना सूचविल्या आहेत. निधी मंजुरीसाठी टंचाई आराखडा जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आला आहे.
मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यात तालुक्यातील काही गावांना टंचाईचा सामना करावा लागतो. मे मध्ये टंचाई परिस्थिती तीव्र होते. पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनतो. याशिवाय जनावरांच्या चार्यासाठी शेतकर्यांना धडपड करावी लागते. या उन्हाळ्यात 27 गावांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. कराड पंचायत समिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने संभाव्य पाणी टंचाई आराखडा तयार केला आहे.
त्यानुसार कांबीरवाडी, वनवासमाची खोडशी, अंतवडी, मांगवाडी, नाणेगाव, गोडवाडी, अंधारवाडी, संजयनगर शेरे, पाल भगतवाडी, मरळी, कोरिवळे, महारूगडेवाडी, काले चपनेमळा, ओंडोशी, शेरे थोरातमळा, कासारशिरंबे, रिसवड, गायकवाडवाडी, घोलपवाडी, नांदलापूर, चोरे साखरवाडी, चोरजवाडी, मस्करवाडी, बामणवाडी, वानरवाडी आदी गावांना टंचाईचा सामना करावा लागणार आहे. यामधील बहुतेक गावात विहिर अधीग्रहण करून गावाला पाणीपुरवठा करावा लागणार आहे. काही गावांना टँकरणे पाणीपुरवठा करावा लागणार आहे.
मसूर पूर्व भागातील गायकवाडवाडी, रिसवड,घोलपवाडी यासह काही गावात भीषण पाणी टंचाई निर्माण होते. पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होते. यावर्षीही याच समस्येचा ग्रामस्थांना सामना करावा लागणार आहे. मध्यंतरी दोन वेळा उन्हाळी पाऊस जोरदार कोसळल्याने तलावात, विहिरीत काही प्रमाणात पाणी साठले. पिकांनाही पावसाचा आधार मिळाला. त्यामुळे पिके तरली असली तरी मे अखेरपर्यंत शेतीच्या पाण्याचा प्रश्न या विभागात गंभीर होणार आहे.
हणबरवाडी-धनगरवाडी योजना सुरू झाल्याने मसूर पूर्व भागातील अनेक गावात पाणी खळखळू लागले आहे. रिसवडला एप्रिल, मे मध्ये पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. यावेळी मात्र तेथे ओढ्यांना पाणी वाहत आहे. विहिरीतील पाणी पातळी वाढली आहे. शेतीला पाणी मिळत आहे. या योजनेमुळे रिसवडसह अनेक गावातील टंचाई दूर झाली आहे असे सांगून ग्रामस्थ आ.मनोज घोरपडे यांना धन्यवाद देत आहेत.
मे मध्ये काही गावांना पर्यायी पाण्याची व्यवस्था नसल्याने टँकरणे पाणी पुरवठा करावा लागतो. यावर्षी घोलपवाडी, नांदलापूर, चोरे साखरवाडी, चोरजवाडी, मस्करवाडी, बामणवाडी, वानरवाडी येथे टँकरणे पाणी पुरवठा करावा लागणार आहे. या गावांची अद्याप टँकरची मागणी आली नसली तरी पुढील काही दिवसात या गावांना टँकरणे पाणीपुरवठा करावा लागणार असल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने टंचाई आराखड्यात नमूद केले आहे.
कराड तालुक्याचा टंचाई आराखडा तयार करण्यात आला असून आवश्यक उपाययोजना आखण्यात आल्या आहेत.ज्या गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे त्या ठिकाणी तातडीने कामे सुरू होतील.टँकरची मागणी आल्यास तेथे टँकर सुरू केला जाईल.
आर.बी.साठे उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा