

कराड : कराड नगरपालिकेच्या उपनगराध्यपदासाठी व स्वीकृत नगरसेवकांसाठीची निवडणूक प्रक्रिया पार पडली. उपनगराध्यक्षपदासाठी पोपटराव उर्फ प्रतापराव साळुंखे यांची बिनविरोध निवड झाली. तर स्वीकृत नगरसेवकपदासाठी लोकशाही आघाडीचे जयतंकाका पाटील, यशवंत आघाडीचे नरेंद्र लिबे व भाजपाचे सुहास जगताप यांच्या निवडी जाहीर झाल्या. निवड पिठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी या निवडी जाहीर केल्या. यावेळी मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांची उपस्थिती होती. निवडीनंतर कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. संपूर्ण नगरपालिका परिसर गुलालामध्ये न्हावून गेला.
सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत उपनगराध्यक्षपदासाठीचे अर्ज दाखल करण्यात येणार होते. त्यामुळे सकाळी 11.30 वाजता निवड पिठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्या उपस्थितीत मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांचेकडे पोपटराव साळुंखे यांनी अर्ज दाखल केला. 12 वाजेपर्यंत एकच अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध उपनगराध्यक्षपदासाठी निवड जाहीर करण्यात आली. एकच अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाल्याने अर्ज दाखल केल्यानंतर लोकशाही आघाडीच्या समर्थकांनी नगरपालिकेबाहेर फटाक्यांची आतषबाजी करण्यास सुरूवात केली. त्यानंतर 12 वाजता नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत निवड जाहीर करण्यात आली.
स्वीकृत नगरसेवकपदासाठी दि. 15 रोजी सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचेकडे लोकशाही आघाडीच्यावतीने माजी उपनगराध्यक्ष तथा लोकशाही आघाडीचे मार्गदर्शक सुभाषराव पाटील, लोकशाही आघाडीचे विद्यमान अध्यक्ष जयंतकाका पाटील व जयंत बेडेकर यांचे नामनिर्देशन गटनेत्यांच्या शिफारशीने दाखल करण्यात आले. तर कराड पालिकेतील विरोधी भाजपच्यावतीने राजेंद्र डुबल व माजी नगरसेवक सुहास जगताप यांचे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले होते. यशवंत विकास आघाडीचे हणमंतराव पवार व नरेंद्र लिबे यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते.
कराड पालिकेतील संख्याबळानुसार तीन जण स्वीकृत सदस्य होणार असल्याने संख्याबळानुसार लोकशाही आघाडी, यशवंत विकास आघाडी व भाजपतर्फे प्रत्येकी एक जण स्वीकृत होणार असल्याने लोकशाही आघाडीकडून जयंतकाका पाटील, यशवंत आघाडीकडून नरेंद्र लिबे, भाजपाकडून सुहास जगताप यांच्या निवडी नगराध्यक्षांनी जाहीर केल्या.
राजेंद्रसिंह यादव म्हणाले, नरेंद्र लिबे अनेक वर्षे यशवंत आघाडीसोबत काम करत आहेत. जेव्हा जेव्हा पार्टीसाठी थांबण्याची वेळ आली तेव्हा तेव्हा ते थांबले आहेत. ‘देर से मगर दुरूस्त’ अशी संधी लिबे यांना देण्यात आली आहे. समाजासाठी ते काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर जबाबदारी दिली आहे.