

कराड : आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर 29 ऑगस्ट पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनासाठी राज्यभरातून लाखो मराठा बांधव मुंबई येथे दाखल झाली आहेत. गत दोन दिवसांपासून मुंबई येथे असलेल्या मराठा बांधवांची जेवणाची गैरसोय होत असल्याचे लक्षात आल्यानंतर कराड तालुका मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने शनिवारी ट्रक भरून जेवण व पाच हजाराहून अधिक पाण्याच्या बाटल्या मुंबईकडे पाठवल्या.
संघर्ष योद्धा मनोज जारंगे पाटील यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे यासह विविध मागण्यांसाठी हे उपोषण सुरू आहे. मुंबई येथील उपोषणाची तयारी गत चार महिन्यांपासून मनोज जरंगे पाटील करत होते. त्यासाठी त्यांनी राज्यभराचा दौरा करून मराठा बांधवांना मुंबईमध्ये आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार लाखो मराठा बांधव मुंबई येथे आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. सकल मराठा बांधव मुंबईत पोहोचल्यानंतर त्यांनी संपूर्ण मुंबई जाम केली होती. त्यानंतर मनोज जरांगे-पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार व पोलिसांनी केलेल्या सूचनांप्रमाणे अनेक आंदोलनकर्त्यांनी आपली वाहने पार्किंग तळावरती लावली आहेत.
आंदोलनकर्त्यांच्या वाहनांसाठी दिलेले पार्किंग तळ लांब असल्याने त्यांना आझाद मैदानापासून दररोज पार्किंग तळावरती जाणे शक्य होत नाही. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी आपल्याबरोबर वाहनातून आणलेले जेवणाचे साहित्य तसेच वाहनात अडकून पडले आहे. त्यातच मुंबईमध्ये जोरदार पाऊस सुरू असल्याने आंदोलनकर्त्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. तशाही परिस्थितीमध्ये आंदोलनकर्त्यांनी आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरणार नाही अशी भूमिका घेतली असून मुंबईमध्ये स्थान मांडून थांबले आहेत.
याच दरम्यान मुंबई येथील खाद्याची दुकाने, हॉटेल्स, व्यवसायीक हात गाडे, फळांचे गाडी हे बंद करण्यात आल्याने तसेच पाणीपुरवठाही बंद केल्याने आंदोलनात सहभागी झालेल्या मराठा बांधवांची प्रचंड मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यामुळे आंदोलनकर्त्यांचा उद्रेक वाढत आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर कराड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकार्यांनी त्वरित तालुक्यातील सकल मराठा समाजाला आवाहन करून आपापल्या परीने आंदोलनकर्त्यांसाठी जेवण देण्याची विनंती केली. त्यानुसार शनिवारी सायंकाळपर्यंत तालुक्याच्या विविध भागातून मराठा समाजाच्या वतीने भाकरी, चटणी, भाजी यासह विविध प्रकारचे खाद्यपदार्थ गोळा करण्याचे काम सुरू होते. कराड येथील दत्त चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या शेजारी तालुक्यातून विविध गावातून आलेले जेवणाचे साहित्य ट्रकमध्ये भरून तो ट्रक रात्री उशिरा मुंबईकडे रवाना केला जाणार होता. ट्रक मुंबईकडे जात असताना वाटेमध्ये उंब्रज परिसरातील मराठा बांधव त्या भागातील जेवणाचे साहित्य ट्रक मध्ये भरणार आहेत.
पाच हजाराहून अधिक पाण्याच्या बाटल्या...
कराड तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शिरवळ येथे पाच हजाराहून अधिक पाण्याच्या बाटल्या घेऊन ठेवल्या आहेत. त्याही पाण्याच्या बाटल्या याच ट्रकमधून पाठवल्या जाणार आहेत. आंदोलनात सहभागी झालेल्या मराठा बांधवांची गैरसोय होऊ नये आणि आंदोलन यशस्वी व्हावे, शांततेच्या मार्गाने मराठ्यांना आरक्षण मिळावे, अशी भावना मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकार्यांनी व सकल मराठा समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे.