Karad traffic management: कराडातील वाहतूक व्यवस्थेबाबत सोमवारी महत्त्वपूर्ण बैठक

दै. ‌‘पुढारी‌’च्या वृत्ताची दखल; नगराध्यक्ष करणार शहर पोलिसांशी चर्चा
Karad traffic management
Karad traffic managementPudhari
Published on
Updated on

कराड : कराड आणि मलकापूर शहरांमध्ये वाढत्या अपघातांच्या मालिकेमुळे वाहतूक व्यवस्था, अतिक्रमणे, रस्त्यावरील पार्किंग आणि निष्क्रिय झालेली सिग्नल यंत्रणा हे प्रश्न पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहरात वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. दै. ‌‘पुढारी‌’ने ‌‘कराड-मलकापूर अपघातांचे शहर की बेफिकिरीचे?‌’ या वृत्ताद्वारे आवाज उठविला. त्यानंतर तातडीने दखल घेत सोमवार, 30 मार्च रोजी पोलिस प्रशासन, नगरपालिका व व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहे, असे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी सांगितले.

बुधवारी कराड शहरात एका प्राध्यापक महिलेचा अपघात झाल्यानंतर शहरातील नागरिकांनी वाहतूक व्यवस्थेच्या ढिसाळपणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. या घटनेनंतर कराड शहरातील रस्त्यांची अवस्था, वाहतूक नियंत्रणाचा अभाव, अतिक्रमण आणि बेशिस्त पार्किंग या प्रश्नांकडे पुन्हा लक्ष वेधले गेले. कराड शहरातील वाहतूक प्रश्न सोडवण्यासाठी आणि अतिक्रमण हटवण्याच्या दृष्टीने सोमवार दि. 30 मार्च रोजी बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी दिली आहे. या बैठकीत वाहतूक आराखडा तयार करणे, महत्त्वाच्या चौकांमधील अतिक्रमणे हटवणे, पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारणे आणि वाहतूक पोलिसांची संख्या वाढवणे या मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान शहरातील वाढते अपघात, सर्वच प्रमुख मार्गावर व्यवसायिकांनी केलेले अतिक्रमण या सर्व पार्श्वभूमीवर कराड शहर रस्ता सुरक्षा समितीची स्थापना करण्यात आली आहे. पालिका प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाशी चर्चा करत वाहतूक सुरक्षित करण्यास प्राधान्य देणे हा समितीचा हेतू आहे. या समितीमधील माजी नगरसेवक अशोकराव पाटील, मोहन कदम, भूषण जगताप, गणेश पवार, राहुल चव्हाण, वाजीद मुल्ला, नितीन ओसवाल, बाळासाहेब सोनुलकर, अमित पाटणकर यांनी शुक्रवारी पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, वाहतूक शाखेचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांची भेट घेतली. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कराड नगरपालिका प्रशासन यांची संयुक्त बैठक होणार असल्याचे पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news