Karad taluka: कराड तालुका; यंदाही पाणी टंचाईचे सावट

54.98 लाखांचा कृती आराखडा; 19 गावांत पाणी टंचाईची शक्यता, टँकरसाठी 13.14 लाखांची तरतूद
Water Supply
Water SupplyPudhari
Published on
Updated on
अशोक मोहने

कराड : यंदाचा उन्हाळा तीव्र राहण्याचा अंदाज व्यक्त होत असतानाच कराड तालुक्यातील मसूर पूर्व भाग व कराड दक्षिण विभागातील काही गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर कराड पंचायत समिती अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला असून मार्च ते जून या कालावधीसाठी टप्प्याटप्प्याने उपाय योजना निश्चित केल्या आहेत. 54.58 लाखांचा कृती आराखडा तयार करण्यात आला असून संभाव्य टंचाईग्रस्त गावांना टँकरणे पाणीपुरवठा करण्यासाठी 13.14 लाखांची तरतूद करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांत पाणीटंचाईचा सामना करावा लागणाऱ्या गावांसाठी प्राथमिक टप्प्यातील उपाय सुचवण्यात आले आहेत. जानेवारी ते मार्च दरम्यान 14 गावांत नवीन विधन विहिरी घेण्याचा प्रस्ताव आहे. तसेच 9 गावे आणि 5 वाड्यांध्ये नळपाणीपुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती प्रस्तावित करण्यात आली आहे.

याशिवाय 13 गावे व एका वाडीमध्ये विहिरींचे खोलीकरण व गाळ काढणे ही कामे केली जाणार आहेत. या सर्व कामांसाठी एकूण 54 लाख 98 हजार रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. या उपाययोजनांमुळे पाण्याची उपलब्धता वाढवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. एप्रिल, मे व जून या पुढील तिमाहीसाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्यानुसार 18 गावे व एका वाडीत खाजगी विहिरींचे अधिग्रहण करावे लागणार आहे. या 19 गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यता आहे. काही गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागणार असून एप्रिल व मे महिन्यांत 5 गावे व 2 वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे. यासाठी 13 लाख 14 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.

रिसवड, चिखली, वाघेरी चिंचमळा, गायकवाडवाडी, बानुगडेवाडी, गोसावेवाडी आदी गावांना एप्रिल, मे मध्ये पाणी टंचाईचा सामना करावा लागेल. हरबरवाडी -धनगरवाडी योजनेचे पाणी जरी सोडले तरी ते शेती व पिण्यासाठी पुरेसे ठरणार नाही. पंधरा ते वीस दिवसात आवर्तन सोडले तर येथील पाणी टंचाईवर मात करता येईल,असे विभागातील शेतकऱ्यांनी सांगितले. गायकवाडवाडी येथे हणबरवाडी -धनगरवाडी योजनेची पाईपलाईन झाली आहे. मात्र ती लहान आहे. त्यामुळे गायकवाडवाडी तलावात पाणी पोहचत नाही. पाणीपुरवठ्याच्या विहिरी तलावाला लागून आहेत. तलावात पाणीसाठा झाला तर विहिरींना पर्क्युलेशनने पाणी येईल, पर्यायाने गावांना उन्हाळ्यात पाणी उपलब्ध होईल. या दिवसात भूजलपातळीतील पाण्याची घट आणि अपुऱ्या पावसामुळे या गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो.

कराड दक्षिणमधील लटकेवाडी, गणेशवाडी, ओंडोशी, भुरभुशी, घराळवाडी आदी गावांना एप्रिल व मे मध्ये पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. उंडाळे प्रादेशिक योजनेमुळे शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला असला तरी काही वाड्यांना मे मध्ये पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. यावर्षीही काही वाड्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.

येवती तलावतील पाणी पुरेशा प्रमाणात सोडले तर एप्रिल, मे मध्ये पुरेसे पाणी उपलब्ध होईल. तलावातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवून पाण्याचे नियोजन करावे. येवती तलावाला पाणी सोडण्याचे नियोजन व्हावे. येवती कॅनॉलला गळती असल्याने पाणी वाया जात आहे. सांगली पाटबंधारे विभागाने याचे नियोजन करावे.
- सिध्दनाथ घराळ- घराळवाडी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news