

कराड : कराड शहरातील छत्रपती शिवाजी स्टेडियम झोपडपट्टी परिसरात पोलिसांनी शनिवारी छापा टाकून सुमारे 2 लाख 1 हजार रुपयांचा 8 किलो 50 ग्रॅम गांजा जप्त केला. जिल्हा पोलिस दलाच्या अमली पदार्थविरोधी मोहिमे अंतर्गत ही कारवाई केली असून, एका महिलेसह दोघांना अटक केली.
या प्रकरणी परवीन इब्राहिम पटेल (रा. इदगाह मैदान रोड, शिवाजी स्टेडियम झोपडपट्टी) व साथीदार संदीप सतीश पाटील (वय 37, रा. सुपने ) यांच्यावर कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. हवालदार सागर बर्गे यांनी याबाबत फिर्याद दिली.
पोलिस अधीक्षक व अप्पर पोलिस अधीक्षक यांनी जिल्ह्यात अमली पदार्थविरोधी मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. शनिवारी उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील यांना गांजा विक्रीबाबतची माहिती मिळाली होती. यानंतर त्यांच्या आदेशानुसार सहायक पोलिस निरीक्षक नीलेश तारू यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय व कराड शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने स्टेडियम झोपडपट्टी परिसरात छापा टाकला.
यामध्ये गांजासह दोघांना ताब्यात घेतले. हवालदार असिफ जमादार, प्रवीण पवार, सागर बर्गे, दीपक कोळी, स्वप्निल साबळे, मयूर देशमुख, मारुती लाटणे तसेच कॉन्स्टेबल सरिता मोहिते यांनी कारवाईत सहभाग घेतला.