कराड ; पुढारी वृत्तसेवा : राजस्थानहून कोल्हापूरकडे निघालेल्या कारची त्याच दिशेला जाणार्या ट्रक्टर-ट्रॉलीला पाठिमागून जोरदार धडक बसली. या अपघातात कारमधील दोन वर्षाचा मुलगा व पाच वर्षाच्या मुलीसह सहाजण जखमी झाले. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान अपघात होताच कारच्या धडकेनंतर ट्रक्टरट्रॉली नाल्यात पलटी झाली. पुणे-बंगळूर आशियायी महामार्गावर आटके गावाच्या हद्दीत गुरुवारी मध्यरात्रीनंतर साडेतीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
सरवणसिंग राजपूत (वय 30), मफिकंवर राजपूत (वय 35 रा. भोकरा, ता. जालोर, राजस्थान) असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या चालकासह दोघांची नावे आहेत. तर मोडसिंग राजपूत (वय 60), दुर्गाकंवर राजपूत (वय 5), भुपाल राजपूत (वय 2), कुडाकर राजपूत (सर्व रा. भोकरा, ता. जालोर, राजस्थान) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. अपघातातील सर्व जखमींवर येथील कृष्णा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कार (क्रमांक के ए 15 एल 8640) मधून राजपूत कुटुंबीय रजस्थानहून कर्नाटकच्या दिशेने जात होते. पुणे-बंगळूर अशियायी महामार्गावर गुरूवारी मध्यरात्रीनंतर साडेतीन वाजण्याच्या सुमारास आटके गावाच्या हद्दीत आले असता कारचालकाचा कारवरील ताबा सुटल्याने नेमके त्याचवेळी कोल्हापूर दिशेलाच दोन ट्रॉली घेऊन निघालेल्या ट्रक्टर (क्रमांक एम एच 09 सी 4905) च्या मागील ट्रॉलीला पाठीमागून जोराची धडक झाली. धडक एवढी जोरात होती की दोन्ही ट्रॉलीसह ट्रक्टर नाल्यात घुसल्याने एक ट्रॉली पलटी झाली. तर कारच्या समोरील बाजूचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात चालक सरवणसिंग राजपूत यांच्यासह पुढील सीटवर बसलेली महिला असे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग देखभाल विभागाचे कर्मचारी कुमार नायचल, विकास पाटील, नितीन विरकर, श्रीधर जाखले, आदित्य आडके, सुरज देवकर हे रूग्णवाहिकेसह तातडीने अपघातस्थळी दाखल झाले. अपघाताची खबर कराड तालुका पोलिसांसह महामार्ग पोलिसांना दिली. महामार्ग पोलिसांसह देखभाल विभागाच्या कर्मचार्यांनी तातडीने आपघातस्थळी धाव घेतली. जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने रूग्णवाहिकेतून कृष्णा रूग्णालयात उपचाराकरिता पाठवले. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक कांही काळ विस्कळीत झाली होती. अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला घेऊन महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.