

कराड : कराड शहरातील प्रमुख आणि अत्यंत वर्दळीच्या शाहू चौकात गुरुवारी सायंकाळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. या कोंडीमुळे दुचाकी, चारचाकी तसेच रिक्षा चालकांना बराच वेळ अडकून पडावे लागले. विशेष म्हणजे, एवढ्या महत्त्वाच्या चौकात वाहतूक नियंत्रणासाठी एकही वाहतूक पोलिस कर्मचारी उपस्थित नसल्याने वाहनचालकांतून संताप व्यक्त करण्यात आला.
शाहू चौक हा कराड शहरातील प्रमुख मार्गांना जोडणारा केंद्रबिंदू मानला जातो. शाळा, महाविद्यालये, व्यापारी, शासकीय कार्यालये असल्याने येथे दिवसभर मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. मात्र, नियोजनाअभावी आणि वाहतूक नियंत्रणाच्या दुर्लक्षामुळे या चौकात वारंवार कोंडी होत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.
गुरुवारी सायंकाळी कार्यालये सुटण्याच्या वेळेत वाहनांची संख्या अचानक वाढल्याने संपूर्ण चौक ठप्प झाला. काही वाहनचालकांनी चुकीच्या पद्धतीने वाहने घुसवल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली. वाहतूक शाखेचे कर्मचारी वेळेवर उपस्थित नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.