

कराड : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांनी मुहूर्तमेढ रोवलेल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सभा शुक्रवारी अभूतपूर्व गोंधळ, आरोप-प्रत्यारोप आणि परस्परविरोधी घोषणाबाजीने गाजली. प्रश्न विचारण्याची संधी न देता सभा अवघ्या १५ ते २० मिनिटांत गुंडाळल्याचा आरोप आमदार मनोज घोरपडे व आमदार धैर्यशील कदम यांनी केला. तर सहकार नियमांनुसारच सभा पार पडल्याचे सांगत माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विरोधकांचे आरोप फेटाळले. सभा बेकायदेशीर असल्याचा दावा करत ती रद्द करून नव्याने सभा घेण्यासाठी सहकार खात्यासह शासनाकडे तक्रार करणार असल्याचे दोन्ही आमदारांनी सांगितले.
सभेची वेळ दुपारी दोन वाजताची असताना वेळेपूर्वीच सभा सुरू केल्याचा दावा करत आमदार मनोज घोरपडे, आमदार धैर्यशील कदम, निवास थोरात, रणजित पाटील यांच्यासह विरोधी गटाचे समर्थक सभास्थळी दाखल झाले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रश्न विचारण्यासाठी माईक देण्याची मागणी केली. त्यावेळी बाळासाहेब पाटील सभासदांना मार्गदर्शन करत होते. विरोधक आक्रमक झाल्याने सत्ताधारी गटाचे समर्थकही व्यासपीठासमोर जमा झाले आणि घोषणाबाजी सुरू झाली.
गोंधळ सुरू असतानाही बाळासाहेब पाटील यांनी सभेपुढील विषयांचे वाचन सुरू ठेवले. उपस्थित सभासदांना विषय मंजूर असल्याची विचारणा करून सर्व विषय मंजूर झाल्याचे जाहीर करत गोंधळामुळे सभा संपल्याचे सांगण्यात आले.
प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत, प्रश्न विचारण्याची संधी मिळाली नाही, असा आरोप करत विरोधकांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली. पोलिस उपअधीक्षक राजश्री पाटील यांनी दोन्ही आमदार तसेच बाळासाहेब पाटील यांच्याशी चर्चा करून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र समर्थकांमध्ये धक्काबुक्कीची स्थिती निर्माण झाली.
दुपारी सव्वातीनच्या सुमारास कारखान्याच्या दुसर्या प्रवेशद्वारावर आमदार मनोज घोरपडे व आमदार धैर्यशील कदम यांच्या उपस्थितीत प्रतिसभा झाली. यावेळी बाळासाहेब पाटील व संचालक मंडळाच्या कारभारावर आरोप करत निषेध नोंदविण्यात आला. त्यानंतर विरोधी गट निघून गेल्यानंतर बाळासाहेब पाटील यांनी सभास्थळी उपस्थित सभासदांशी संवाद साधला.
दिवाळीवेळी मोफत साखर न्यायला येणार...
मोफत साखर देण्याचे आश्वासन देऊनही बाळासाहेब पाटील यांनी १५ रुपये किलोने साखर विक्री सुरू केली आहे. सभासदांवरील हा अन्याय असून, दिवाळीपर्यंत प्रतीक्षा करत दिवाळीला मोफत साखर नेण्यासाठी आम्ही येणार असल्याचा इशारा आमदार धैर्यशील कदम यांनी दिला आहे.