

कराड : कराड शहराभोवती प्रस्तावित असलेल्या महत्त्वाकांक्षी नेकलेस रोड प्रकल्पाचा प्राथमिक आराखडा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने गुरुवारी कराड नगरपालिकेच्या सभागृहात नगरसेवकांसमोर सादर करण्यात आला. सुमारे ६८० कोटी रुपयांच्या या प्रकल्पात यशवंतराव चव्हाण समाधीस्थळ सुशोभीकरण, वाहतूक सुलभीकरण, रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट आणि पर्यावरण संवर्धन या चार प्रमुख बाबींचा विचार करण्यात आला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता देसाई यांनी व्हिडिओ चित्रफितीच्या माध्यमातून प्रकल्पाचे सादरीकरण केले. यावेळी नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, उपनगराध्यक्ष प्रतापराव साळुंखे, लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंत काका पाटील, विरोधी पक्षनेते विजय वाटेगावकर, सत्ताधारी यशवंत व लोकशाही आघाडीसह भाजपचे नगरसेवक-नगरसेविका तसेच मुख्याधिकारी प्रशांत हटकर उपस्थित होते. प्राथमिक आराखड्यानुसार जुन्या कोयना पुलापासून नवीन कृष्णा पुलापर्यंतचा मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे.
नदीकाठच्या परिसरात घाट, सुशोभीकरण, बगीचा आदी सुविधांचा विकास करण्याचे नियोजन आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ करण्याबरोबरच नदीकाठचा परिसर पर्यटनदृष्ट्या विकसित करण्याचा प्रयत्न या प्रकल्पातून केला जाणार आहे. सादरीकरणानंतर नगरसेवकांनी प्रकल्पाच्या विविध बाबींवर प्रश्न उपस्थित करत शंका व्यक्त केल्या. त्यावर उपअभियंता देसाई यांनी संबंधित माहिती देत शंकांचे निरसन केले. प्रकल्पाचे सादरीकरण अद्याप प्राथमिक स्वरूपाचे असून त्यामध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, प्रकल्पाचे अधिक सुस्पष्ट चित्र नगरसेवकांसमोर यावे यासाठी अद्ययावत थ्रीडी प्रेझेन्टेशन सादर करावे, अशी सूचना नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केली. त्यामुळे पुढील सादरीकरणात प्रकल्पाचे स्वरूप, वाहतूक व्यवस्था, नदीकाठचा विकास आणि प्रस्तावित सुविधांचे अधिक स्पष्ट चित्र समोर येण्याची शक्यता आहे.