

कराड : कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील जैन मठातील महादेवी हत्तिणीला वन विभागाने गुजरातमधील वनतारा येथील आश्रयस्थानी हलविले आहे. ही हत्तीण पुन्हा नांदणी मठात परत आणावी, या मागणीसाठी कराड शहरात मंगळवारी मोटारसायकल रॅली काढण्यात आली. रॅलीस शिवतीर्थ दत्त चौक येथून सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली काढण्यात आली.
रॅलीत ट्रॅक्टरवर महादेवी हत्तिणीची प्रतिकृती ठेवण्यात आली होती. विविध सामाजिक संघटना, नागरिक आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीचा मार्ग दत्त चौक, आझाद चौक, चावडी चौक, कन्याशाळा, कृष्णा नाका, विजय दिवस चौक असा होता. नागरिकांच्या ‘महादेवी परत आणा’ या घोषणांनी शहर दणाणून गेले.
महादेवी हत्तिणीचा वापर कथितपणे मिरवणुकांमध्ये केल्याचा आरोप प्राणी कल्याण संस्थेने (पेटा) केल्यानंतर, ही बाब न्यायालयात गेली होती. त्यानंतर समितीच्या शिफारशींवर आधारित न्यायालयीन निर्णयानुसार हत्तिणीला वनतारामध्ये हलविण्यात आले. मात्र, गेल्या तीन दशकांपासून नांदणी मठाशी आणि कोल्हापूरकरांशी जोडलेले हत्तिणीचे जिव्हाळ्याचे नातेही नागरिकांच्या भावना दुखावणारे ठरले आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरसह कराड, सांगली, सातारा परिसरात स्वाक्षरी मोहिमा, जनजागृती आणि आंदोलनात्मक कार्यक्रम राबवले जात आहेत. कराडमधील ही रॅली त्याच मोहिमेचा एक भाग होती.