

प्रतिभा राजे
कराड : कराड नगरपालिका सदस्यांसाठी बुधवारी झालेल्या आरक्षणामध्ये कराडवर महिलाराज आल्याचे स्पष्ट झाले आहे. सदस्य संख्या 31 पैकी 16 प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाल्याने महत्त्वाच्या व अनेक आजी माजी पदाधिकारी, इच्छुकांच्या दांड्या गुल झाल्या आहेत. तर प्रभाग क्र. 5 मध्ये सर्वसाधारण महिला व अनुसूचित जाती आरक्षण पडल्यामुळे माजी उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, सुभाषराव पाटील यांच्यासह इच्छूकांच्या दांड्या उडाल्या आहेत.
मातब्बरांच्या प्रभागात महिला व अनुसूचित जातीसाठी आरक्षण पडल्यामुळे सर्वसाधारण महिला आरक्षण व ज्या ठिकाणी खुले आरक्षण अपेक्षित होते अशा ठिकाणी खुले आरक्षण पडले नसल्याने अनेक इच्छूकांच्या दांड्या गुल झाल्या आहेत. मात्र राजेंद्रसिंह यादव, विजय वाटेगावकर, शारदा जाधव, स्मिता हुलवान, सुहास जगताप, सौरभ पाटील, फारूक पटवेकर, अल्ताफ शिकलगार, मोहसिन आंबेकरी, सुप्रिया खराडे यांचे प्रभाग सेफ राहिले आहेत. अनेक दिग्गजांची संधी हुकणार असल्याने नगराध्यक्षपदासाठीची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आरक्षण सोडतीमध्ये प्रभाग क्र. 4,5,11,15 मध्ये अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षण पडले आहे. तर उर्वरित प्रभागांमध्ये 10 जागा महिलांसाठी तर 9 सर्वसाधारण नागरिकांचा प्रवर्ग आरक्षण व नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या 8 जागा आरक्षित झाल्या आहेत. त्यामुळे दिग्गजांना प्रभाग शोधावे लागणार आहेत.
प्रभाक क्र. 1 मध्ये माजी नगरसेविका अरूणा पाटील, सोहेब सुतार प्रयत्न करू शकतील. प्रभाग क्र. 2 मध्ये सौरभ पाटील, सुहास पवार तसेच रणजितनाना पाटील, विनायक कदम. याशिवाय सर्वसाधारण महिला आरक्षणामुळे अनिता पवार यांना सुद्धा संधी आहे. प्रभाग 3 मध्ये राजेंद्र माने, अख्तर आंबेकरी, कश्मिरा इंगवले, साहेबराव शेवाळे, संकेत पवार, जावेद नायकवडी, मंगेश कांबळे.तर जयवंतराव पाटील यांना होम पीचवर लढता येवू शकत नसल्याने तेही यासाठी प्रयत्न करू शकतात. प्रभाग क्र. 4 मधून सामाजिक कार्यकर्ते रणजितनाना पाटील यांची संधी हुकल्याने त्यांनाही अन्य प्रभागात प्रयत्न करावा लागेल. ते नगराध्यक्षपदासाठी प्रयत्न करू शकतात तसेच त्यांच्या घरातील महिला सदस्यांनाही संधी देवू शकतात.
प्रियांका यादव, विद्या पावसकर, अरूणा जाधव या प्रभागात प्रयत्न करू शकतात. प्रभाग क्र. 5 मध्ये अर्चना पाटील, निशिकांत ढेकळे, गजेंद्र कांबळे, आनंदराव लादे तसेच रेवती सागर बर्गे संधी निर्माण झाली आहे. योगेश लादे, सुद्धा प्रयत्न करू शकतात. प्रभाग क्र. 6 मध्ये माजी नगराध्यक्ष अल्ताफभाई शिकलगार, सादिकमिया मुल्ला, नुरूल मुल्ला, प्रकाश जाधव, उबाठा गटाचे शेखर बर्गे यांच्या घरातील महिला सदस्यांना संधी देण्याची शक्यता आहे. तसेच सुनंदा उमेश माने, प्रणाली वैभव माने प्रयत्न करू शकतात. प्रभाग क्र. 7 मध्ये सुहास जगताप, जयंत बेडेकर, माजी नगरसेविका अंजली कुंभार, सावित्री मुठेकर, माजी उपनगराध्यक्ष सुभाषराव डुबल, विष्णू पाटसकर. प्रभाग क्र. 8 विजय वाटेगावकर यांच्यासाठी सेफ राहिला आहे. याठिकाणी माजी नगराध्यक्षा शारदा जाधव प्रयत्न करू शकतात.
प्रभाग 9 मध्ये हणमंतराव पवार, अतुल शिंदे, पोपटराव साळुंखे, माजी नगराध्यक्षा विद्याराणी साळुंखे, समीर मोमीन तसेच फारूक पटवेकर यांच्या घरातील महिला सदस्या. प्रभाग 10 माजी नगरसेवक बाळासाहेब यादव, फारूक पटवेकर, श्रीकांत मुळे, आशा मुळे, ओंकार मुळे, विक्रम भोपते यांच्यासाठी सेफ राहिला आहे. प्रभाग 11 मध्ये माजी उपनगराध्यक्ष सुभाषराव पाटील, जयवंतराव पाटील प्रयत्न करू शकतात. तर अनुसूचित जाती प्रवर्गासाठी माजी नगरसेविका माया भोसले, अक्षय सुर्वे, रमेश वायदंडे यांच्या घरातील महिला सदस्या. प्रभाग क्र. 12 राजेंद्रसिंह यादव यांचा प्रभाग सेफ राहिला आहे. याठिकाणी इंद्रजित गुजर प्रयत्न करू शकतात. याठिकाणी राजेंद्रसिंह यादव यांना माननारा वर्ग आहे.
मात्र याठिकाणी ऋतुराज मोरेही प्रयत्न करू शकतात. प्रभाग क्र. 13 मध्ये स्मिता हुलवान यांच्यासाठी सेफ राहिला आहे. तर संजय शिंदे, सतीश भोंगाळे सर्वसाधारण प्रवर्गामुळे प्रयत्न करू शकतात. प्रभाग क्र. 14 मध्ये माजी नगराध्यक्षा उमा हिंगमिरे, शिवाजी पवार, महादेव पवार, माजी नगराध्यक्ष रामचंद्र कोळी, ललित राजापुरे, राहुल खराडे, इंद्रजित भोपते, बंडा शिंदे. प्रभाग क्र. 15 मोहसिन आंबेकरी यांचा प्रभाग सेफ राहिला आहे. याठिकाणी अख्तर आंबेकरी प्रयत्न करू शकतात. तसेच सुप्रिया खराडे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी प्रयत्न करू शकतात.
नगराध्यक्षपदासाठी चुरस वाढणार
अनेकांच्या प्रभागात उलथापालथ झाली असल्याने नगराध्यक्ष पदासाठी चुरस वाढण्याची शक्यता आहे. यासाठी मातब्बरांचे प्रयत्न सुरू राहतील. नगराध्यक्ष पदासाठी माजी उपनगराध्यक्ष सुभाषराव पाटील, माजी उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, माजी नगरसेवक सौरभ पाटील, अतुल शिंदे, सुहास जगताप, रणजितनाना पाटील, विक्रम पावसकर, शिवराज मोरे, झाकीर पठाण, आनंदराव लादे तसेच अन्य इच्छूक प्रयत्न करतील अशी चर्चा आहे.