

कराड : मलकापूर शहराला लागून असलेल्या आणि शासनाच्या निर्मलग्राम पुरस्काराने गौरवलेल्या कोयना वसाहतीमध्ये घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. वाढते शहरीकरण, लोकसंख्येतील वाढ आणि बदलती जीवनशैली यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होत असून, कचऱ्याची शास्त्रीय विल्हेवाट कशी लावायची याचे मोठे आव्हान ग्रामपंचायतीसमोर आहे.
कोयना वसाहतीची 2021 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या 3 हजार 687 इतकी होती. मात्र सध्या स्थलांतरित व तरंगती लोकसंख्या धरून हा आकडा तब्बल 9 हजार 500 च्या घरात पोहोचल्याचे स्थानिक प्रशासनाचे म्हणणे आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबरच घरगुती, व्यावसायिक व प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ओला व सुका मिळून दररोज सुमारे सहा ट्रॉली कचरा जमा होत असून, या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ग्रामपंचायतीकडे स्वतःची जागाच उपलब्ध नाही.
त्यामुळे जखिणवाडी ग्रामपंचायत हद्दीत भाडेपट्ट्याने जागा घेऊन त्या ठिकाणी कचरा साठवणूक व वर्गिकरण केले जात आहे. मात्र ही व्यवस्था किती काळ चालवायची आणि त्यासाठी दरमहा किती भाडे खर्च करायचे, या विवंचनेत ग्रामपंचायत आहे. वाढत्या खर्चामुळे ग्रामपंचायतीवरील आर्थिक ताण वाढत आहे.
ग्रामपंचायतीकडे कचरा वर्गिकरणासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, यंत्रणा आणि मनुष्यबळाचीही कमतरता आहे. अल्प वेतनामुळे सफाई कर्मचारी व मजूर उपलब्ध होत नसल्याने वर्गिकरणाची प्रक्रिया प्रभावीपणे राबविण्यात अडचणी येत आहेत. परिणामी नाले साफ केले तरी नाल्यातून काढलेली घाण रस्त्याकडेला अनेक दिवस जैसे थे अवस्थेत असते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. जखिणवाडी हद्दीत टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणाच उपलब्ध नाही. त्यामुळे कोयना वसाहतीमधील कचऱ्याचा प्रश्न गंभीर होणार आहे.