

कराड : कराड - विटा मार्गावर ओगलेवाडी (ता. कराड) रेल्वे स्टेशननजीकच्या पुलावर मंगळवारी रात्री कार आणि टेम्पो यांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. यात ओंड (ता. कराड) येथील दोन युवक जागीच ठार झाले आहेत. तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. रात्री 1 वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ओमकार राजेंद्र थोरात (वय 28) आणि गणेश सुरेश थोरात (25, दोघेही रा. ओंड) अशी अपघातात मृत्यू झालेल्या युवकांची नावे आहेत. तर ऋषिकेश कुबेर थोरात (28, ओंड) आणि रोहन पवार (25, पूर्ण नाव व पत्ता समजू शकला नाही) अशी जखमींची नावे आहेत. रोहन हा नाशिक येथील असल्याची प्राथमिक माहिती आली आहे. याप्रकरणी टेम्पो चालक दिगंबर सोपान धुळे (रा. लिंबोटी, जि. नांदेड) यांनी कराड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
ओमकार थोरातसह गणेश आणि जखमी दोघे विटा बाजूकडून कराडच्या दिशेने येत होते. त्याचवेळी टेम्पो कराडकडून विट्याच्या दिशेने निघाला होता. ओगलेवाडी रेल्वे स्टेशन परिसरातील पुलावर दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात कार चालक ओमकार आणि त्याचा चुलत भाऊ गणेश यांचा जागीच मृत्यू झाला. तर ऋषिकेश आणि रोहन हे दोघे गंभीर जखमी झाले. कराड शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही जखमींना खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. कार चालक ओमकार याच्याविरोधात अपघातास कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.