

कराड : वहागाव, ता. कराड येथील जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक पात्र शाळा ठरली असून सुद्धा गेल्या तीन वर्षांपासून शाळेला मुख्याध्यापक मिळालेला नाही. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी आदर्श सरपंच संग्राम पवार यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी बिपीन मोरे यांच्या दालनातच धरणे आंदोलन केले.
कराड तालुक्यातील पहिली ते चौथी सर्वात जास्त पट व भौतिक सुविधांनी परिपूर्ण असणारी शाळा म्हणून वहागांवची जिल्हा परिषद शाळा नावारूपास आली आहे. परंतु गेली तीन वर्षे शाळेला पूर्णवेळ मुख्याध्यापक मिळत नसल्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
वारंवार पाठपुरावा करून सुद्धा शिक्षण विभाग दुर्लक्ष करत असल्याने अखेर शाळा व्यवस्थापन समितीने धरणे आंदोलन केले. शिक्षण अधिकारी सातारा यांनी महिन्याच्या आत पूर्णवेळ मुख्याध्यापक देऊ असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. दरम्यान संग्राम पवार म्हणाले, जिल्हा परिषद शाळेचा दर्जा सुधारण्याबरोबर आवश्यक भौतिक सुविधा पुरविण्यासाठी ग्रामपंचायत पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.