

कराड : ग्रामीण व निमशहरी भागात घरगुती गॅस सिलिंडरच्या टंचाईची समस्या कायम असताना सरकारकडून रॉकेल वाटपाची घोषणा करण्यात आली होती. मात्र घोषणा होऊन महिना उलटूनही अद्याप अनेक तालुक्यांमध्ये प्रत्यक्षात रॉकेल उपलब्ध झालेले नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. "पुढील सोमवारी उपलब्ध होईल" असे आश्वासन प्रशासनाकडून सातत्याने दिले जात असले तरी प्रत्यक्षात रेशन दुकानदारांकडे साठाच पोहोचलेला नसल्याची परिस्थिती आहे.
ग्रामीण भागात अनेक कुटुंबे स्वयंपाकासाठी गॅसवर अवलंबून आहेत. पण गॅस सिलिंडर वेळेत मिळत नाही. यात्रांचा हंगाम सुरू असल्याने आणि पुणे, मुंबईसह बाहेरगावी असणारी नोकरदार मंडळी सुट्टीवर गावी आली आहेत. पण अनेक कुटुंबांना गॅस टंचाईचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी सिलिंडर मिळवण्यासाठी दोन ते तीन दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याचे नागरिक सांगत आहेत. त्यातच रॉकेलही उपलब्ध नसल्यामुळे गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांचे दैनंदिन नियोजन विस्कळीत झाले आहे.
रेशन दुकानदारांच्या म्हणण्यानुसार, शासनाकडून रॉकेल वाटपाचे आदेश प्राप्त झाले असले तरी प्रत्यक्ष पुरवठा झालेला नाही. त्यामुळे नागरिकांच्या रोषाला त्यांनाही सामोरे जावे लागत आहे. अनेक गावांमध्ये महिलांनी रेशन दुकानांवर चौकशीसाठी गर्दी केली असून प्रशासनाकडून स्पष्ट माहिती दिली जात नसल्याची तक्रार आहे.
केंद्र सरकारने गेल्या काही वर्षांत रॉकेल वापर कमी करण्याचे धोरण स्वीकारले असून एलपीजी वापर वाढविण्यावर भर दिला आहे. मात्र मध्यंतरी युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागला. गॅस टाकी मिळवण्यासाठी गॅस एजन्सी व गोडाऊनजवळ ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या पार्श्वभूमीवर सरकारने रॉकेलचा पुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र महिना झाला तरी अद्याप रेशन दुकानांवर रॉकेल पोहोचलेले नाही. केव्हा येणार याची खात्रीशीर माहिती पुरवठा विभागातून मिळत नाही, त्यामुळे दुकानदार व ग्राहक दोघेही संभ्रमात आहेत.
ग्रामीण भागात गॅस वितरण व्यवस्था अद्याप पूर्ववत झाली नसल्याने पर्यायी इंधनाची गरज कायम आहे. त्यामुळे रॉकेल वाटपाची केवळ घोषणा करून उपयोग नसून प्रत्यक्ष पुरवठा सुरळीत करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. दरम्यान, "गॅस टंचाईमुळे संतप्त झालेल्या लोकांच्या भावना शांत करण्यासाठीच सरकारने रॉकेल वाटपाची वरवर घोषणा केली का?" असा सवाल नागरिक उपस्थित करत असून प्रशासनाने तातडीने स्पष्ट भूमिका जाहीर करण्याची मागणी होत आहे.
"कराड तालुक्याला अद्याप रॉकेलचा साठा उपलब्ध झालेला नाही. मात्र प्राप्त होणार असल्याबाबतच्या सूचना वरिष्ठ स्तरावरून प्राप्त झाल्या आहेत. याबाबत रेशन दुकानदारांना कल्पना देण्यात आली आहे."
- साहिला नायकवडे पुरवठा अधिकारी कराड