Karad News : कराड उत्पादन शुल्कचे बड्या दारू विक्रेत्यांना अभय?

अवैध दारू विक्री आणि वाहतुकीकडे दुर्लक्ष ; वर्षभरात केवळ किरकोळ कारवाया
liquor
iquorpudhari photo
Published on: 
Updated on: 

कराड : कराड राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शहरासह तालुक्यात अवैध दारू विक्री आणि वाहतुकीचे प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी असतानाही विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप होत आहे. किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करून स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्या यंत्रणेने मोठ्या दारू विक्रेत्यांकडे मात्र दुर्लक्ष केले आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.

कराड शहर आणि तालुक्यात विविध ठिकाणी चोरट्या मार्गाने दारू विक्री सुरू असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, शनिवारी एकादशीनिमित्त ड्राय डे असतानाही काही बार सुरू असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली. या दिवशी दारूची चोरटी विक्री सुरू असल्याच्या तक्रारीही पुढे आल्या. मात्र, दिवसभरात उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाकडून ठोस कारवाई झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, गेल्या आठवड्यात रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे दीड कोटी रुपयांचा अवैध दारूसाठा जप्त करण्यात आला. संबंधित दारू वाहतूक करणारे वाहन सातारा जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली. सातारा जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात दारूची येत असेल, तर जिल्ह्यातील उत्पादन शुल्क विभागाची भरारी पथक नेमके काय करत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुसरीकडे, ताडीमध्ये भेसळ करून विक्री होत असल्याच्या तक्रारी आहेत. पावडरचा वापर करून बनावट ताडी तयार केली जात असल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे. अशा प्रकारांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षभरात कराड उत्पादन शुल्क विभागाने मोठ्या अवैध दारू साठ्यांवर किती कारवाया केल्या, मोठ्या विक्रेत्यांवर काय कारवाई झाली आणि भरारी पथकाची गस्त किती प्रभावी आहे, याचा आढावा घेण्याची गरज आहे. केवळ किरकोळ कारवायांपुरते मर्यादित न राहता अवैध दारू व्यवसायाच्या मुळापर्यंत पोहोचण्याचे आव्हान विभागासमोर आहे. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.