

कराड : भारतात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्यावतीने शुक्रवारी दि.27 रोजी कराडमधील कृष्णा विश्व विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये राज्यस्तरीय ‘मॉक पार्लमेंट’चे आयोजन करण्यात आले आहे.
‘मॉक पार्लमेंट’मध्ये भाजप महिला मोर्चाच्या महाराष्ट्रातील पदाधिकारी खासदारांच्या भूमिकेत सहभागी होत, आणीबाणीच्या काळातील लोकशाहीवरील हल्ल्याची चर्चा करणार आहेत. 1975 साली लागू झालेली आणीबाणी हा भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील काळा अध्याय मानला जातो. त्या काळात मानवी हक्कांची गळचेपी, स्वातंत्र्याचा संकोच आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभांची कुचंबणा यांचा संपूर्ण देशाने अनुभव घेतला होता. 21 महिन्यांच्या त्या अंधकारमय कालखंडाची आठवण आजही देशवासीय विसरलेले नाहीत. या आणीबाणीला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत.या पार्श्वभूमीवर आणीबाणीच्या काळातील लोकशाहीवरील हल्याची चर्चा करण्यात येणार आहे.
भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आ.सौ. चित्रा वाघ यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता या ‘मॉक पार्लमेंट’चे उद्घाटन होणार आहे. याप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.डॉ. अतुलबाबा भोसले प्रमुख उपस्थित असतील. सकाळी 10 ते 4 पर्यंत या ‘मॉक पार्लमेंट’चे कामकाज चालणार आहे. तसेच आणीबाणीचा कालखंड, त्याचे राजकीय व सामाजिक परिणाम आणि लोकशाही मूल्यांचे महत्त्व या विषयांवर अभ्यासपूर्ण आणि प्रभावी भाषणे सादर करणार आहेत. समारोप सत्राला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे प्रमुख उपस्थित राहणार असल्याची माहिती, कार्यक्रमाच्या संयोजिका तथा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रा. वर्षा भोसले यांनी दिली आहे.