

मसूर : बांधकाम खात्याच्या निष्काळजीपणामुळे कराड - मसूर मार्गाची विशेषतः बनवडी फाट्यापासून मसूरपर्यंत मोठी दुरवस्था झाली आहे. सातारा जिल्ह्यातील कराडसह अन्य तालुक्यांना जोडणाऱ्या या मार्गाची साधी डागडुजी होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्याचबरोबर मोठमोठ्ठे खड्डे वाहन चालकांसह प्रवाशांच्या जीवावरच उठल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळेच बांधकाम खात्याला कोणाच्या बळीची प्रतिक्षा आहे का ? असा संतप्त प्रश्न उपस्थित होत आहे.
कराड उत्तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे मसूर ते बनवडी फाटा हा रस्ता मृत्यूचा सापळा ठरत आहे. दररोज या रस्त्यावरून शेकडो दुचाकी, चारचाकी वाहने, प्रवासी वाहतूक, तसेच उसाच्या बैलगाड्या व उसाने भरलेले ट्रॅक्टर ये-जा करतात. मात्र रस्त्यावर पडलेल्या खोल खड्ड्यांमुळे वाहनधारकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. खड्डे चुकवताना अनेक वेळा वाहने घसरून अपघात होता आहेत. दररोज सरासरी किमान एक अपघात या मार्गावर होत आहे.
तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बघ्याची भूमिका घेतली जात आहे, ही बाब अत्यंत संतापजनक आहे. या गंभीर परिस्थितीचा शिवसेना ठाकरे गटाने निषेध व्यक्त केला आहे. पक्षाचे कराड उत्तरचे तालुकाप्रमुख संजय भोसले यांनी 25 जानेवारीपर्यंत खड्डे कायमस्वरूपी पद्धतीने मुजवावेत. अन्यथा 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल. या आंदोलनाची तीव्रता बांधकाम विभागाच्या उदासीनतेवर अवलंबून असेल. त्यामुळेच आता तरी प्रशासनाने झोपेतून जागे होणार का याबाबत उत्सुकता आहे.