

कराड : पुणे-बंगळूर महामार्गालगत मलकापूर (ता. कराड) येथील लाहोटीनगरमधील व्यंकटेश गृहनिर्माण सोसायटीतील रिलॅक्स बारमध्ये दारू पिल्यानंतर मित्रानेच मित्रावर सशस्त्र हल्ला केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. जुन्या भांडणाचा राग मनात धरून संशयिताने हे कृत्य केले आहे. या हल्ल्यातील गंभीर जखमी युवकाचा उपचारावेळी रविवारी सकाळी मृत्यू झाला असून, शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयितास ताब्यात घेतले आहे.
सुदर्शन ऊर्फ राजू हणमंत चोरगे (वय 26, सध्या रा. पोळ वस्ती, आगाशिवनगर, मलकापूर, मूळ रा. गलमेवाडी, ता. पाटण, जि. सातारा) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. आदित्य पांडुरंग देसाई (21, रा. कोल्हापूर नाका, कराड) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी प्रियदर्शनी हणमंत चोरगे हिने फिर्याद दिली आहे.
शनिवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास संशयित आदित्य देसाई, सुदर्शन चोरगे हे काही मित्रांसोबत दारू पिण्यासाठी रिलॅक्स बारमध्ये गेले होते. दारू पिताना आदित्य देसाई आणि सुदर्शन चोरगे यांच्यात शाब्दिक वाद झाला. दारू पिऊन सर्वजण व्यंकटेश सोसायटीसमोरील रिकाम्या जागेत आल्यानंतर पुन्हा वाद झाला. यावेळी तुला आता संपवितो असे म्हणत अचानकपणे आदित्य देसाई याने सुदर्शन चोरगे यांच्या पोटावर व छातीवर गुप्तीसारख्या शस्त्राने वार केले. गंभीर जखमी सुदर्शनला उपचारासाठी कृष्णा रूग्णालयात दाखल करण्यात आले.
रविवारी सकाळी गंभीर जखमी सुदर्शन चोरगे याचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी संशयित आदित्य देसाई याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.