

तासवडे टोलनाका : मलकापूर येथे बंदिस्त नाल्याच्या चेंबर मधून सतत येणाऱ्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे इंगवले वस्ती परिसरातील शेतात दलदल झाली आहे. या परिसरात ऊस तोडणाऱ्या मजुरांच्या टोळ्या राहत असून या कुटुंबांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दुर्गंधीयुक्त पाण्याचा तत्काळ बंदोबस्त करावा याबाबतचे निवेदन आगाशिवनगर येथील गणेश पोळ या शेतकऱ्याने मलकापूर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, आगाशिवनगर परिसरात इमर्सन कंपनी समोर नकाशात परंतु दुर्लक्षित असणाऱ्या 33 फुटी पानंद रस्त्यालगत गणेश पोळ याच्यासह स्थानिक शेतकऱ्यांच्या शेती जमिनी आहेत. सदर पाणंद रस्त्यावर मलकापूर नगरपालिकेने काही वर्षांपूर्वी सांडपाण्याची पाईपलाईन करून जागोजागी ड्रेनेजचे चेंबर काढले आहेत. त्या चेंबर मधील शेवटचा चेंबर गणेश पोळ आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या शेता जवळ काढण्यात आला आहे. दरम्यान सांडपाण्याच्या पाईपलाईनचे काम अपुरे असल्यामुळे नगरपालिकेने अजून त्यातून सांडपाणी सोडले नाही. तरीही या परिसरातील काही लोक त्या ड्रेनेजमध्ये सांडपाणी सोडत आहेत. याबाबत स्थानिक शेतकऱ्यांनी तेथील नागरिकांना समज दिली मात्र अद्याप दखल घेतली गेली नाही.
चेंबर मधून येणाऱ्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे या परिसरातील शेती दलदल युक्त झाली असून नापिक बनली आहे. याच परिसरात ऊसतोड करणाऱ्या मजुरांच्या टोळ्या राहत आहेत. त्या टोळ्यांच्या झोपडीतही दुर्गंधीयुक्त पाणी जात आहे त्यामुळे या लोकांच्याही आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मलकापूर पालिकेने सांडपाणी सोडणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी. तसेच ड्रेनेजच्या चेंबर मधून येणाऱ्या दुर्गंधीयुक्त पाण्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.