

कराड : पूर्वीच्या प्रेमसंबंधानंतर वारंवार संशय घेत वाद घालणाऱ्या कराडमधील तरुणाचा महिलेने काटा काढल्याची धक्कादायक घटना मलकापूरमधील (ता. कराड) आगाशिवनगर परिसरात घडली आहे.
राजेंद्र मरीआप्पा काळे (रा. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममागे, कराड) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर सारिका चंद्रकांत कोळी (मूळ रा. अक्कलकोट, जि. सोलापूर, हल्ली रा. मलकापूर) असे संशयित महिलेचे नाव आहे. संशयित महिलेने पहाटे तीनच्या सुमारास कुऱ्हाडीने मानेवर व चेहऱ्यावर घाव घातल्याने तरूणाचा जागीच मृत्यू झाला आहे. महिलेला कराड शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून सारिका हिला 20 फेब्रुवारीपर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
सारिका ही मुलीसोबत मलकापूरच्या आगाशिवनगर परिसरात असणाऱ्या इंगवले वस्तीमधील श्रीराम कॉलनीत वास्तव्यास होती. तिला दोन विवाहित मुली असून एका भाड्याने घेतलेल्या खोलीत रहात असलेल्या सारिका कोळी हिच्याच खोलीत राजेंद्र काळे सोमवारी रात्री गेला होता.
राजेंद्र काळे हा गवंडी काम करतो. तर संशयित सारिका मजुरीचे काम करते. संशयित सारिका हिने राजेंद्र काळे याच्यासोबत पूर्वी प्रेमसंबंध असल्याचे सांगितले आहे. तसेच काळे हा वारंवार संशय घेत सारिका हिच्याशी भांडण करत होता. घटनेच्या रात्री उशिरा दोघांमध्ये पुन्हा जोरात वाद झाला आणि त्याने पुन्हा सारिका कोळी हिला मारहाण केली. या मारहाणीमुळे रागाच्या भरात सारिका हिने घरातील कुऱ्हाडीने राजेंद्र याच्या मानेवर व चेहऱ्यावर वार केले असल्याची माहिती प्राथमिक चौकशीतून समोर आली आहे.
घटनेनंतर पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी इमर्सन कंपनीसमोरील श्रीराम कॉलनीतील एका घरात राजेंद्र काळे हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. तर सारिका ही हातात कुऱ्हाड घेऊन बसलेली दिसली. पोलिसांनी तातडीने राजेंद्र याला रूग्णालयात दाखल केले होते. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. घटनेच्या वेळी तिची मुलगी घरात उपस्थित होती. पोलिसांनी संशयित सारिका हिला ताब्यात घेतले आहे. त्यानंतर तिला अटक करत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले.