

कराड : पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावर मलकापूर ता. कराड येथे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे वाहनधारक हैराण झाले आहेत. सलग सुट्ट्यांमुळे रस्त्यावर वाहनांची गर्दी होत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे शनिवारी दिवसभर महामार्गावर लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यातच अरुंद रस्त्यामुळे मोठमोठी वाहने अडकून पडत असल्याने वाहनधारकांसह प्रवासी चांगलेच वैतागले आहेत. याचा नाहक त्रास प्रवाशांसह वाहनधारक, चालक व नागरिकांना सहन करावा लागला.
कराड ते मलकापूर दरम्यान सुरू असलेल्या सुमारे साडेतीन किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलाच्या कामामुळे महामार्गावरील वाहतूक वारंवार विस्कळीत होत असते. गत दोन वर्षांपासून उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्यानंतर महामार्गावरील वाहतूक सेवा रस्त्यावरून वळवण्यात आली आहे. अनेक ठिकाणी अरुंद सेवा रस्त्यांमुळे वाहतूक कोंडीची समस्या वारंवार निर्माण होत आहे.
या उड्डाणपूलाच्या दोन्ही बाजूला भरावा पूल करण्याचे काम सुरू असून उड्डाणपूलाखालून आठ पदरीकरणाचा रस्ता करण्यात येणार आहे. या आठ पदरीकरणाअंतर्गत उड्डाणपुलाच्या पिलरच्या दोन्ही बाजूला चार-चार लेनचा रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. या चार लेनमध्येही सिमेंट काँक्रीट गटरचे काम सुरू आहे. हे सिमेंट काँक्रिटीकरण गटरचे काम अनेक ठिकाणी अर्धवट अवस्थेत असून त्यामुळे महामार्गावरील वाहतूक सेवा रस्त्यावरून वळवण्यात आली आहे. हे सेवा रस्तेही अनेक ठिकाणी गटरच्या सुरू असलेल्या बांधकामामुळे अरुंद झाले आहेत. त्यामुळे कराड ते मलकापूर दरम्यान व पुढे पाचवड फाट्यापर्यंत तसेच सातारा बाजूकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक ठिकाणी सेवा रस्त्यावरून वाहतूक वळवण्यात आल्याने वारंवार वाहतूक कोंडी होत आहे.
मुंबई, पुणेसह मोठमोठ्या शहरांमध्ये नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने असलेले चाकरमानी सलग सुट्टी असल्याने गावाकडे येत होते. त्यामुळे शनिवारी सकाळपासूनच महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खाजगी वाहनांची गर्दी झाली होती. तसेच एसटी, ट्रॅव्हल्सलाही मोठ्या प्रमाणावर मुंबई, पुणेकडून गावाकडे येणाऱ्या प्रवाशांची गर्दी दिसून येत होती. त्यामुळे बस स्थानकांमध्ये तसेच महामार्गावर थांबणाऱ्या प्रवाशांची गर्दीही वाढली आहे. त्यातच महामार्गावर मोठे मोठे कंटेनर मालवाहतूक यासह छोट्या मोठ्या वाहनांची वर्दळ असल्याने या सर्वांचा परिणाम म्हणून महामार्गावर वाहनांची रांग लागल्याचे दिसून येत होते.