

कराड : कापील ता. कराड येथील श्रीरामनगर परिसरात दोन बछड्यांसह मादी बिबट्याचे वारंवार दर्शन होत आहे. शेतकर्यांच्या समोरच मादी बिबट्या आपल्या दोन बछड्यांनाबरोबर उसाच्या शेतातून सतत फिरत असल्याचे दिसून येत आहे. घुमटमळा श्रीरामनगर परिसरातील वस्तीवरील कुत्र्यांची संख्या हळूहळू घटत चालली आहे. बिबट्याच्या सततच्या वावरामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कापिल येथे घुमटमळा नावाच्या शिवारात जाधव भावकीची दाट लोकवस्ती आहे. लोकवस्तीच्या चारी बाजूने सर्वांची शेती आहे. या परिसरात ऊस पिकासह भाजीपाला व भात पीक घेतले जाते. गेली पंधरा दिवसांपासून या परिसरात दोन बछड्यांसह मादी बिबट्याचे अनेक शेतकर्यांना वारंवार दर्शन झाले आहे. माणसांची चाहूल लागताच बिबट्या उसाच्या शेतात आश्रय घेतो. उसाच्या या रानातून दुसर्या रानात ये-जा करत असताना अनेक शेतकर्यांना या बिबट्याचे दर्शन होत आहे. त्यामुळे शेतकरी रानात जाण्यासही धजवत नाही. एकट्याने न जाता समूहाने शेतात जाण्याची वेळ या परिसरातील शेतकर्यांच्या वर आली आहे.
सध्या भात पिकाची काढणी सुरू आहे. यावर्षी भात पिकाची काढणी मशीनद्वारे करण्यात येत असून या मशीनच्या आवाजाने ही बिबट्याची सैरावैरा धावत उसाच्या शेतात धूम ठोकत आहेत. बिबट्याचे दर्शन होताच शेतकर्यांची चांगलीच घाबरगुंडी उडत आहे. घुमटमळा परिसरात असलेल्या लोकवस्तीतील कुत्र्यांची संख्या हळूहळू कमी होत चालली आहे. बिबट्याचा सततचा वावर वाढल्यामुळे या परिसरातील शेतकर्यांमधे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरातील बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.
बिबट्याच्या हल्ल्याच्या अनेक घटना...
आगाशिव डोंगराभोवतीच्या गावात अनेकवेळा बिबट्याने शेळ्या ठार केल्या आहेत. गेल्या काही महिन्यात चचेगाव, आगाशिवनगर, जखिणवाडी, धोंडेवाडी, नांदलापूर शिवारात शेतातील वस्तीवरील शेळ्या अनेकवेळा ठार केल्या आहेत. रानातील वस्तीवर बिबट्याने हल्ला करण्याच्या घटना वारंवार घडल्या आहेत. त्यामुळे या परिसरात किमान महिन्यातून एकदा बिबट्याचा हल्ला होण्याचे समिकरणच झाले आहे.