Krishna Sugar Factory Election: संस्थापक पॅनेलेचे 2 उमेदवारी अर्ज अवैध

सुरेश पाटील यांचा अर्ज वैध, 139 पैकी 122 अर्ज वैध, माघारीस 9 जूनपर्यंत मुदत
Krishna Sugar Factory Election: संस्थापक पॅनेलेचे 2 उमेदवारी अर्ज अवैध
Administrator
Published on
Updated on

कराड : रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीत दाखल उमेदवारी अर्जांच्या छाननी प्रक्रियेत महत्त्वपूर्ण घडामोड घडली. दाखल झालेल्या सहा हरकतींपैकी पाच हरकती मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पाच उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले असल्याचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी अपर्णा यादव यांनी जाहीर केला.

संस्थापक पॅनेलचे उमेदवार सुरेश पाटील यांच्यावरील हरकत मात्र फेटाळण्यात आल्याने त्यांचा अर्ज वैध ठरला आहे. संस्थापक पॅनेलचेच उमेदवार डॉ. उमा देसाई व अविनाश पाटील यांचे अर्ज मात्र अवैध ठरले. कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीसाठी एकूण 139 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 10 अर्ज दुबार असल्याने तसेच सात अर्ज नामंजूर झाल्याने आता निवडणुकीच्या रिंगणात 122 उमेदवारांचे अर्ज शिल्लक राहिले आहेत. वैध उमेदवारांची यादी आज जाहीर करण्यात आली.

छाननी प्रक्रियेदरम्यान विविध गटांतील उमेदवारांच्या अर्जांवर हरकती घेण्यात आल्या होत्या. त्यामध्ये डॉ. उमा देसाई यांचे कराड अर्बन बँकेचे थकीत कर्ज असल्याने महिला राखीव व गट क्रमांक दोनमधील दोन्ही अर्ज अवैध ठरविण्यात आले. अविनाश पाटील यांना दोनपेक्षा अधिक अपत्ये असल्याने गट क्रमांक तीनमधील त्यांचे दोन अर्ज बाद करण्यात आले. महेश पवार व राजेंद्र पाटील यांच्या सूचकांवर कारखान्याची थकबाकी असल्याने अनुक्रमे गट क्रमांक चार व पाचमधील अर्ज नामंजूर करण्यात आले. विजय जयसिंग बल्लाळ यांचाही अर्ज थकबाकीच्या कारणावरून अनुसूचित जाती-जमाती राखीव प्रवर्गातून अवैध ठरविण्यात आला.

दरम्यान, उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी 9 जूनपर्यंत मुदत देण्यात आली असून सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत उमेदवार अथवा सूचकांमार्फत अर्ज मागे घेता येणार असल्याचे सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news