Karad News | कोल्हापूर नाक्यावरील वळण मार्ग केला बंद

वाहनधारकांची गैरसोय; कराडात येण्यासाठी वारुंजी फाट्यावरून घ्यावा लागतो वळसा
Karad News |
कराड : कोल्हापूर नाक्यावरून शहरात येणारा वळण रस्ता बंद करण्यात आला आहे. दुसरीकडील वळण रस्ता बॅरिकेडस् लावून बंद केला असून वाहनांची ये-जा होऊ नये म्हणून तेथे कर्मचारी उभा केला आहे.Pudhari Photo
Published on
Updated on

कराड : पुणे-बंगळूर आशियाई महामार्गाच्या कराडजवळील उड्डाणपुलाचे काम गतीने सुरू आहे. या उड्डाणपुलाचे सेगमेंट बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, येथील कोल्हापूर नाक्यावरील वळण रस्ता सेगमेंट बसवण्याच्या कामासाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाले असून, त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. कोल्हापूर बाजूकडून कराड शहरात येण्यासाठी वाहनधारकांना आता वारुंजी फाट्यावरून वळसा मारून यावे लागत आहे. त्यामुळे जुन्या कोयना पुलावरती रहदारी वाढल्या असून, वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनधारकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

पुणे-बंगळूर आशियाई महामार्गाच्या सहा पदरीकरणाचे काम सुरू आहे. त्या अंतर्गतच कराड-मलकापूर दरम्यान सुमारे साडेतीन किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल बनवण्याचे काम गतीने सुरू आहे. या उड्डाणपुलाच्या कामाचा भाग म्हणून कोल्हापूर नाक्यावरती सेगमेंट बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हे सेगमेंट बसवण्यासाठी शुक्रवारी कोल्हापूर नाक्यावरून कराड शहरात येणारा वळण मार्ग बंद करण्यात आला. तो शनिवारी ही तसाच बंद ठेवण्यात आला होता.

कोल्हापूर नाक्यावरील वळण मार्ग बंद केल्याने मलकापूर, आगाशिवनगर, ढेबेवाडी, उंडाळे विभाग व कोल्हापूर बाजूकडून कराड शहरात व कराडातून पुढे विटा बाजूकडे जाणार्‍या वाहनांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली. येणार्‍या वाहनधारकांना पुढे वारुंजी फाट्यावरून वळसा मारून जुन्या कोयना पुलावरून कराड शहरात प्रवेश करावा लागत होता. यामुळे वाहनधारकांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. त्याचबरोबर वेळ वाया जात असून वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत होते.

रस्ते विकास महामंडळाच्या अधिकार्‍यांनी कोल्हापूर नाक्यावरील वळण रस्ता बंद करत असताना तेथून जवळच पाठीमागे संगम हॉटेल समोर सेगमेंट बसवलेल्या उड्डाणपुलाखाली वळण रस्ता करावा, अशी मागणी वाहनधारक व नागरिकांनी केली होती. मात्र अधिकार्‍यांनी नागरिकांच्या मागणीचा विचार न करता कोल्हापूर नाक्यावरती वळण रस्ता न ठेवता यापूर्वी असलेला रस्ताही बंद केला. त्यामुळे वाहन धारकांना त्रास सहन झाल्याने त्यांच्या मधून संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. दरम्यान कोल्हापूर नाक्यावरती वळण रस्ता न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

दरम्यान, नागरिकांच्या आंदोलनाचा विचार करून शनिवारी कोल्हापूर नाक्यावरती वळण रस्ता सुरू करण्याचा प्रयत्न ठेकेदार व रस्ते विकास महामंडळाच्या अधिकार्‍यांनी केला. त्यानंतर काही वेळातच पुन्हा कोल्हापूर नाक्यावरील वळण रस्ता बंद केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.

जुन्या कोयना पुलावर वाहतूक कोंडी अन् रुग्णांचे हाल

कोल्हापूर नाक्यावरील वळण रस्ता बंद केल्याने आगाशिवनगर, मलकापूर, ढेबेवाडी विभाग व उंडाळे विभागातून कराड शहरातील रुग्णालयात येणार्‍या रुग्णांना त्रास सहन करावा लागला. अनेक वेळा सिरीयस असलेल्या रुग्णांना रुग्णवाहिकेतून त्वरित रुग्णालयात घेऊन जात असताना कोल्हापूर नाक्यावरील वळण रस्ता बंद असल्याने वारुंजी फाट्यावरून घेऊन जावे लागत होते. त्यातच वारुंजी फाट्यावरून कराड शहरात येणार्‍या वाहनांची रहदारी वाढल्याने जुन्या कोयना पुलावर वाहतूक कोंडी होऊन त्यामध्ये रुग्णवाहिका अडकून आणखीनच वेळ होत होता. त्यामुळे कोल्हापूर नाक्यावरून बंद केलेला वळण रस्ता त्वरित खुला करून रुग्णांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news