

रेठरे बुद्रुक : खुबी ता.कराड येथे जनावरांसाठी बांधण्यात आलेल्या पत्र्याच्या शेडमधील लोखंडी जाळीला शॉर्ट सर्किट होवून दोन दुभत्या गायी दगावल्या. दरम्यान मालकाच्या जीवावर आलेला प्रसंग मुक्या प्राण्यावर बेतला. बुधवारी सकाळी हा प्रकार घडला.
खुबी येथे गावच्या बाहेर पाटील शिवारात अर्जुन मारूती काशिद यांचे जनावरांचे शेड आहे. सकाळी ते व त्यांच्या पत्नी सुजाता काशिद गायींचे दूध काढत होते. अचानक गायी पाठीमागे सरल्याने लोखंडी जाळीला स्पर्श झाला. जाळीला स्पर्श होताच एक गाय जागेवर कोसळली. तो पर्यंत बाजूला असलेली दुसरी गाय त्या गायीला चिकटली. तिलाही विजेचा धक्का लागला. यामध्ये दोन्ही जनावरे जागेवरच लगावली.
सुदैवाने काशिद दाम्पत्य बचावले आहेत. प्रसंग ओळखून काशिद यांनी शेडमधील म्हैशीला बाहेर काढले. दरम्यान शेड मधील विद्युत डीपी कशाने शॉर्ट झाली याचा शोध घेण्यात येत आहे. काशिद यांची परिस्थिती बेताची असून कर्ज काढून त्यांनी गायी खरेदी केल्या होत्या. मात्र दोन्ही गायी दगावल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. शेडला करंट आला कसा याबाबत काशिद कुटुंबिय संभ्रमात आहे.
दरम्यान जनावरांच्या शेडला अचानक शॉर्ट सर्किट कसे झाले याची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. शेतात तुटलेल्या तारा व उघड्या पीडीमुळे जनावरे तसेच शेतकरीही दगावल्याच्या घटना यापूर्वी होत्या. वीज वितरण कंपनीच्या हालगर्जीपणामुळे हे प्रकार घडले होते, अशा तक्रारी होत्या.