

कराड : कराड-तासगाव मार्गावरील कार्वे पुलाजवळ पडलेल्या धोकादायक खड्ड्यांमुळे वाहनचालकांचे प्रचंड हाल होत असून अपघातांचा धोका वाढला आहे. पुलाच्या दुसऱ्या पिल्याजवळ एक फुटाचा खड्डा पडला आहे. तसेच लहान मोठे अन्य खड्डेही अपघातास निमंत्रण देत आहेत. या ठिकाणी रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून वाहन चालवताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
विशेषतः या ठिकाणी समोरून येणाऱ्या वाहन चालकांना मोठा खड्डा स्पष्ट दिसत नसल्याने खड्ड्यात वाहन आदळते. गेल्या चार दिवसांत दोन महिला दुचाकीस्वार या खड्ड्यामुळे घसरून जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, संपूर्ण कराड-तासगाव मार्गावर अनेक ठिकाणी खड्ड्यांचे प्रमाण वाढले असून रस्त्याच्या मधील जॉइंट्सही उखडले आहेत. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले असून तात्काळ दुरुस्तीची मागणी करण्यात आली आहे. शेरे येथील निवास निकम यांनी हे निवेदन दिले आहे.