

कराड : पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील पाचवड फाटा, वारूंजी फाटा, कोल्हापूर नाका कोयना पूल परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली असून महामार्गाचे विद्रुपीकरण सुद्धा होत आहे. मात्र महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि ठेकेदार अदानी व डीपी जैन या दोन्ही कंपन्यांना याचे काहीच देणे - घेणे नसल्यासारखी परिस्थिती असून, महामार्गाला अक्षरशः उकिरड्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम दोन दशकांपूर्वी म्हणजेच सन 2005 साली पूर्ण झाले होते. रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या या कामानंतर वारूंजी फाटा, पाचवड फाटा परिसरात स्थानिक व्यावसायिकांकडून कचरा टाकल जातच होता. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने वारूंजी फाटा परिसरात कचरा न टाकण्याबाबत वारंवार सूचना फलक लावले होते. मात्र, याचा काहीच परिणाम कचरा टाकणार्यांवर झालेला नाही. तर पाचवड फाटा परिसरात सेवा रस्त्यालगत मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात होता.
दोन वर्षापूर्वी पुणे - बंगळूर महामार्ग रस्ते विकास महामंडळाकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित झाला असून त्यानंतर महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामाची मुदत दोन वर्ष होती आणि ही मुदत चार महिन्यापूर्वीच संपली आहे. आता 17 जून 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असली तरी सध्याची कासव गती पाहता अजून वर्ष - दीड वर्ष तरी काम पूर्ण होईल की नाही ? याबाबत साशंकता आहे.
सहापदरीकरणाच्या कामांतर्गत पाचवड फाटा परिसरात सेवा रस्त्यासह उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे सेवा रस्त्यावर टाकला जाणारा कचरा आता स्थानिक व्यावसायिकांकडून उड्डाण पुलावरच टाकला जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी परसली असून वाहन चालकांना नाक धरूनच वाहन चालवावे लागत आहे. वारूंजी फाटा आणि कराडजवळील कोयना पूल परिसरात सुद्धा महामार्गालगत कचरा टाकला जातो. त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरत असून महामार्गाचे विद्रुपीकरण होत आहे.
मात्र असे असूनही महामार्ग प्राधिकरणासह मुख्य ठेकेदार कंपनी अदानी व सबठेकेदार कंपनी डीपी जैनकडून केवळ बघ्याचीच भूमिका घेतली जात आहे. महामार्गावर कचरा टाकला जाऊ नये आणि कचरा टाकणार्यांवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी कोणत्याही प्रकारची उपाययोजनाच केली जात नाही. त्यामुळेच महामार्गाचे विद्रुपीकरण आणखी किती दिवस सुरू राहणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महामार्गावर कचरा टाकला जातो, त्या हद्दीतील ग्रामपंचायतीकडूनही कानाडोळा केला जात आहे. त्याचवेळी आपले काहीच दायित्व नसल्यासारखी भूमिका घेत महमार्ग प्राधिकरणासह ठेकेदार कंपन्यांकडून सर्व जबाबदारी स्थानिक ग्रामपंचायतीवर ढकलली जात आहे. त्यामुळेच सद्यस्थितीत महामार्गास कोणी वाली आहे का? असे म्हणण्याची वेळ स्थानिकांसह वाहन चालकांवर आली आहे.