Karad Temperature : कराडकर होरपळले ; तापमान 40 अंशावर

दुपारी 2 ते 4 दरम्यान उष्णतेची लाट
Temperature
TemperaturePudhari
Published on
Updated on

कराड : गेल्या तीन दिवसांपासून कराड शहरासह परिसरात उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली असून दुपारच्या वेळेत तापमान 40 अंशावर पोहचले आहे. उष्णतेची लट निर्माण झाल्याने दुपारी 2 ते 4 या वेळेत रस्त्यांवर नागरिकांची वर्दळ कमी झाली आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले असून उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांत दुपारी 2 ते 4 या वेळेत तापमान 37 ते 40 अंशांच्या दरम्यान नोंदवले गेले. सोमवारी दुपारी तापमान सुमारे 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने उकाड्याची तीव्रता अधिक जाणवली. सकाळपासूनच कडक ऊन पडत असल्याने दुपारी बाजारपेठा, मुख्य रस्ते आणि चौकांमध्ये तुलनेने कमी गर्दी दिसून आली.

वाढत्या उष्णतेमुळे शीतपेय, उसाचा रस, फळांचा रस तसेच कलिंगड, खरबूज यांसारख्या फळांची मागणी वाढली आहे. दुसरीकडे, ग्रामीण भागातील शेतकरी आणि मजूर वर्गालाही उन्हाचा मोठा फटका बसत आहे. दुपारच्या वेळेत शेतीची कामे थांबवावी लागत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

आरोग्य विभागाने नागरिकांना दुपारच्या वेळेत अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे तसेच लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

logo
Pudhari News
pudhari.news