

कराड : मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वनविभागाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार उंडाळे ता. कराड येथे ए.आय. लेपर्ड डिटेक्शन सिस्टम बसविण्यात आली आहे. या सिस्टमला वन्यप्राणी बिबट्या दिसून आल्यास जोरजोरात सायरन वाजण्यास सुरुवात होते. त्यामुळे लोकांमध्ये जागृती होणार आहे. शुक्रवार दि. 17 रोजी बसविलेल्या या स्टिस्टममुळे परिसरातील लोकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
सातारा वन विभाग अंतर्गत वनपरिक्षेत्र कराडमधील वन परिमंडळ कोळे स्थित उंडाळे येथे मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या संकल्पनेतून व वनपरिक्षेत्र अधिकारी ललिता पाटील यांच्या पाठपुराव्याने तसेच ग्रामस्थ व उपसरपंच बापूराव पाटील यांच्या मागणीनुसार वन विभागाकडून ही सिस्टम नुकतीच कार्यन्वित करण्यात आली आहे. यामुळे परिसरातील लोकांना बिबट्या आल्याचे समजल्याने सतर्क होण्यास मदत मिळणार आहे.
मानव आणि वन्यजीव संघर्ष टाळण्याकरिता उंडाळे येथे ही ए.आय. लेपर्ड डिटेक्शन सिस्टम बसविण्यात आली आहे. या सिस्टमला वन्यप्राणी बिबट्या दिसून आल्यास जोरजोरात सायरन वाजण्यास सुरुवात होते. सायरन वाजण्यास सुरुवात झाल्यास लोकांना बिबट्या आल्यास संदेश जाणार असून त्यामुळे लोकांमध्ये जागृती होणार आहे. यामुळे बिबट्या व मानव यांच्यातील संघर्ष टाळण्यास मदत होणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून गावामध्ये बिबट वन्य प्राण्याचा वावर वारंवार दिसून येत असल्याने तसेच शाळा, कॉलेजचे विद्यार्थ्यांचा वावर त्याचा क्षेत्रामध्ये जास्त असल्यामुळे ही बाब लक्षात घेऊन सातारा जिल्ह्याचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी तेथे तात्काळ ए.आय. लेपर्ड डिटेक्शन सिस्टम बसवण्याचे आदेश दिले. त्यानुसार उंडाळे येथे रस्त्यालगत ए.आय.लेपर्ड डिटेक्शन सिस्टम बसविण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या मनामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. सातारचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहाय्यक वनसंरक्षक जयश्री जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी ललिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही सिस्टम बसविण्यात आली आहे. वनरक्षक दशरथ चिट्टे, अभिनंदन सावंत, आर. आर. टी. चे सदस्य रोहित कुलकर्णी, गणेश काळे, वनसेवक सतीश पाटील, अतुल कळसे यांनी सिस्टम लावण्यास मदत केली.