

कराड/मारूल हवेली : पाटण तालुक्यातील मल्हारपेठ परिसरात काही दिवसांपूर्वी कारवाई करत गुटखा साठा पकडण्यात आला होता. मात्र त्यानंतर याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल न होता आर्थिक तडजोड करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. या चर्चेतील सत्यता पडताळण्यासाठी पोलीस अधीक्षकांकडून चौकशी सुरू करण्यात आली असून जिल्ह्यासह पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
मल्हारपेठ परिसरात पोलिसांनी छापा टाकून गुटख्याचा अवैध साठा पकडला होता. पुढे याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन कारवाई होणे अपेक्षित असताना तसे काहीही झालेले नाही. याशिवाय या प्रकरणी ८ लाखांची आर्थिक तडजोड झाली असल्याची चर्चा सुरू होती. याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांना दोन ते तीन दिवसापूर्वी मिळाली होती. त्यानंतर या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, या चर्चेनंतर मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंतकुमार काटकर यांनी या चर्चेशी आणि चौकशीबाबत मल्हारपेठ पोलीस ठाण्याचा कोणताही संबंध नसल्याचे दैनिक ‘पुढारी’शी बोलताना सांगितले आहे.
एकीकडे असे असले तरी या प्रकरणी मागील दोन ते तीन दिवसांपासून पोलीस अधिक्षकांच्या सूचनेनुसार माहिती व स्थानिक लोकांशी काही विशेष अधिकरी व कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली जात आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून चौकशीतील माहितीचा अहवाल पोलीस अधिक्षकांना सादर केला जाणार असून त्यानंतरच पुढील कारवाई केली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
मात्र सध्यस्थितीत आर्थिक तडजोडीबाबतच्या चर्चेत सत्यता आहे अथवा नाही ? तसेच गुटखा पकडण्याची कारवाई झाली होती अथवा नाही ? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसेच कोणत्या पोलीस ठाण्याचा अथवा कर्मचारी, अधिकाऱ्यांचा यात संबंधत आहे ? हेही स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र असे असले तरी पोलीस अधिक्षकांनी स्वतः लक्ष घातल चौकशी सुरू केल्याने मल्हारपेठ परिसरासह संपूर्ण पोलीस दल हादरल्याचे पहावयास मिळत आहे.