Karad News : दुष्काळ निवारणासाठी ८ कोटी २७ लाखांची मदत मिळणार

१० टक्के पाणी कपातीचे नियोजन : कराडला टंचाई आढावा बैठक
Karad News : दुष्काळ निवारणासाठी ८ कोटी २७ लाखांची मदत मिळणार
Published on: 
Updated on: 

कराड : कराड तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची तीव्रता लक्षात घेऊन दुष्‍काळ निवारणासाठी आणि शेतकऱ्यांना पीक नुकसानीपोटी एनडीआरएफच्या निकषांनुसार ८ कोटी २७ लाख रुपयांची मदत मिळणार आहे, अशी माहिती आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी दिली.

दरम्यान, संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कराड शहर, मलकापूरसह संपूर्ण तालुक्यात दहा टक्के पाणीकपात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्याची गरज भागेल एवढा साठा राखीव ठेवून उर्वरित पाण्याचे शेतीसाठी नियोजन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या अध्यक्षतेखाली कराड तालुक्याची पाणीटंचाई व चाराटंचाई आढावा बैठक झाली. यावेळी आमदार मनोजदादा घोरपडे, आमदार धैर्यशील कदम उपस्थित होते. कराड पंचायत समिती सभापती नंदाताई यादव, जि.प.सदस्य सागर शिवदास, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे, निवासी नायब तहसीलदार बाबुराव राठोड, उपनिबंधक अपर्णा यादव, मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर, पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

आ. डॉ. भोसले म्हणाले, कराड तालुक्याचा दुष्काळी तालुक्यांच्या यादीत समावेश करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश केला आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त तालुक्यांना शासनाकडून मिळणाऱ्या १२ प्रकारच्या सवलतींचा लाभ येथील शेतकऱ्यांना मिळणार आहे. शेतीच्या नुकसानीचे पंचनामे व सर्वेक्षण पूर्ण झाले असून, सुमारे ७ हजार ८०० हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या क्षेत्रासाठी एनडीआरएफच्या निकषांनुसार मदत मिळणार आहे.

आमदार मनोज घोरपडे म्हणाले, अलनिनोच्या पार्श्वभूमीवर दुष्काळाची शक्यता लक्षात घेऊन आत्तापासूनच पाण्याचे काटेकोर नियोजन करणे आवश्यक आहे. ऑगस्टपर्यंत पिण्याचे पाणी, शेती आणि जनावरांसाठी आवश्यक पाण्याची तरतूद करावी लागणार आहे. तसेच रब्बी हंगामासाठी पाण्याची आवर्तने कशी देता येतील, याचे नियोजन संबंधित विभागांनी करावे.

बैठकीत कृषी, जलसंपदा आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सादरीकरणाद्वारे तालुक्यातील पाणीसाठा, उपलब्ध पाणी आणि संभाव्य गरजेची माहिती दिली. शासनाने दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दहा टक्के पाणीकपातीचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार कराड व मलकापूरसह तालुक्यात पाणीकपातीची अंमलबजावणी करण्याच्या सूचना प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. उपलब्ध पाणीसाठ्याचा प्राधान्यक्रम ठरवून पिण्याचे पाणी आणि शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. बैठकीस विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.