

कराड : राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनेक विकासकामांना तात्पुरती मर्यादा आली आहे. तसेच विविध प्रशासकीय बैठका आणि नवीन कामांबाबत निर्णय प्रक्रियाही काही प्रमाणात थांबलेली असल्याने कराड नगरपालिकेतील विविध पक्ष आणि गटांतील नगरसेवकांना सध्या मोकळा वेळ मिळाला आहे. या संधीचा लाभ घेत अनेक नगरसेवकांनी जम्मू-काश्मीर सहलीचा बेत आखल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १८ तारखेला विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पाडल्यानंतर विविध पक्षांचे, गटाचे नगरसेवक, त्यांचे कार्यकर्ते, मित्रमंडळी आणि समर्थक जम्मू-काश्मीरच्या पर्यटन दौर्यासाठी रवाना झाले आहेत. राजकीय व्यस्ततेतून काही काळ विश्रांती मिळाल्याने या सहलीचा आनंद घेण्यासाठी सर्वजण उत्साहाने सहभागी झाल्याचे सांगितले जात आहे.
नगरपालिकेतील विकासकामे, विविध समित्यांच्या बैठका आणि इतर प्रशासकीय उपक्रम आचारसंहितेमुळे मर्यादित झाल्याने नगरसेवकांना दैनंदिन राजकीय धावपळीपासून काहीसा विरंगुळा मिळाला आहे. त्यामुळे हिमालयाच्या कुशीत वसलेल्या जम्मू, श्रीनगर, गुलमर्ग आणि पहलगामसारख्या निसर्गरम्य स्थळांना भेट देत सहलीचा आनंद लुटला जात आहे. या सहलीमध्ये नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक व कार्यकर्त्यांचा समावेश असल्याचे समजते.
दरम्यान, कराड शहरात या सर्वपक्षीय सहलीची चांगलीच चर्चा रंगली असून, आचारसंहितेचा मोकळा वेळ आणि काश्मीरची सफर हा विषय सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. नगरसेवकांच्या या पर्यटन दौर्यामुळे आपापसातील सलोखा आणि संवाद अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.