

कराड : कराड शहरातील महाविद्यालयांमध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थिनींना अपुऱ्या कॉलेज बसफेऱ्यांमुळे मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. बसची संख्या अपुरी असल्याने दुपारी आणि सायंकाळी विद्यार्थिनींना रस्त्याच्या कडेला तासन्तास एसटीची वाट पाहत थांबावे लागत आहे. विद्यार्थ्यांकडून वारंवार मागणी करूनही बसफेऱ्यांमध्ये वाढ होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
कराड परिसरातील विविध गावांतून मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षणासाठी कराडला येतात. मात्र, महाविद्यालयीन वेळांमध्ये पुरेशा बस उपलब्ध नसल्याने त्यांना वेळेवर महाविद्यालयात पोहोचणे कठीण होत आहे. विशेषतः मसूर मार्गावरून कराडकडे येणाऱ्या अनेक बस धावत असल्या, तरी काही बस महाविद्यालयाजवळ थांबत नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होते.
महाविद्यालयांच्या वेळेनुसार बसफेऱ्यांचे नियोजन नसल्याचा फटका विद्यार्थिनींना बसत आहे. उन्हाचा कडाका असो किंवा पावसाची संततधार, रस्त्याच्या कडेला उभे राहून बसची प्रतीक्षा करण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय राहत नाही. बसथांबे उपलब्ध असले, तरी तेथील आसनव्यवस्था मर्यादित असल्याने मोठ्या संख्येने थांबलेल्या विद्यार्थ्यांना त्याचा पुरेसा उपयोग होत नाही.