

प्रतिभा राजे
कराड : कराड शहरात पाण्याच्या मीटर चोरीच्या घटनांनी डोके वर काढले असून, गेल्या काही दिवसांत या प्रकारात लक्षणीय वाढ झाल्याने शहरवासीयांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. सोमवार पेठ, दत्त मंदिर गल्ली परिसर, श्रीधर स्वामी आश्रम परिसर, घाटाजवळील (गरुडांचे घराजवळील) भाग, राममंदिर परिसर तसेच रॉयल पॅलेस परिसर या ठिकाणी सलग दोन-तीन दिवसांत पाण्याचे मीटर चोरीला गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामुळे शहरात भीतीचे वातावरण झाले आहे.
कराड शहरातील अनेक घरांचे पाण्याचे मीटर घराबाहेर, रस्त्यालगत अथवा मोकळ्या जागेत बसवण्यात आलेले आहेत. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या अंधारात हे मीटर काढून नेल्याचा संशय आहे. सकाळी नळाला पाणी येईनासे झाल्यावर नागरिकांना मीटर चोरीला गेल्याचे लक्षात येत असून, त्यामुळे आर्थिक नुकसान, मानसिक त्रास आणि नगरपालिकेच्या कार्यालयांचे फेरे असा दुहेरी त्रास सहन करावा लागत आहे.
शहरात रात्रीच्या वेळी पोलिस गस्त दिसत नाही. चोरट्यांना मोकळे रान मिळाले आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना पोलिस प्रशासनाने संवेदनशील भागांत विशेष गस्त, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी आणि संशयितांवर लक्ष ठेवणे अत्यावश्यक असल्याची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, नागरिकांनी पाण्याचे मीटर सुरक्षित ठिकाणी बसवणे, लोखंडी कव्हर लावणे, तसेच शेजारी-पाजाऱ्यांच्या सहकार्याने रात्री जागरूकता ठेवणे अशा उपाययोजना करण्याचे आवाहन नगरपालिकेने केले आहे. मात्र, केवळ नागरिकांनीच खबरदारी घेणे पुरेसे नसून प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने समन्वयाने तातडीची पावले उचलणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.
कराडसारख्या शहरात मूलभूत सुविधांशी संबंधित चोरीचे प्रकार वाढणे ही गंभीर बाब असून, दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास या घटनांत आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, मोटार चोरीस जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर भाजयुमोचे राज्य सरचिटणीस सुदर्शन पाटसकर यांनी नागरिकांशी संपर्क साधत याबाबत पोलिस प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्यात येणार असून चोरीची दखल घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.