

कराड : शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी केलेले देखावे पाहण्यासाठी या कालावधीत होणार्या गर्दीचा व काही अनुचित प्रक्रार होऊ नये याचा विचार करुन, नगरपरिषदेने शहरातील प्रमुख अशा नागरिकांच्या वर्दळीच्या ठिकाणी 93 कॅमेरे बसविलेले आहेत. विसर्जनाच्या दिवशी नगरपरिषदेकडून स्वागत कक्ष उभारला जाणार आहे. अनंत चतुर्दशीला सार्वजनिक मंडळाच्या श्रींचे विसर्जन सुरळीत पार पडावे यासाठी नगरपरिषदेकडील फिरती पथके तैनात राहणार आहेत.
श्री गणेश उत्सवानिमित्त नगरपरिषदेने शहरातील विविध भागात व श्रींचे आगमन व विसर्जन मार्गावरील आवश्यक ती सर्व कामे पूर्ण केली असल्याची माहिती मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांनी दिली. दरम्यान, यावर्षीचा श्री गणेश उत्सव शासनाने राज्य महोत्सव म्हणून घोषित केला आहे. उत्सवानिमित्त्त पर्यावरण पूरक देखावे व सजावट यासाठी बक्षिसे जाहिर केलेली आहेत. शहरातील गणेश मंडळांनी त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कराड नगरपरिषदेने, शहरातील सर्व रस्त्यावरील खड्डे, चरी, ड्रेनेज चरी, डबरे यावर मुरुम टाकून रोलींग केले आहे. त्यामुळे श्रीं चे आगमन व विसर्जन सुरळीत होणार आहे. तसेच शहरातील सर्व ठिकाणांवरील स्ट्रीट लाईट दुरुस्ती करुन सुस्थितीत करण्यात आलेल्या आहेत. प्रीतिसंगम घाटावर लाईट, फोकस लाईट टॉवर उभारण्याची व्यवस्था केली आहे. तसेच श्री आगमन व विसर्जन मार्गावरील विद्युत वाहिनीस अडथळा निर्माण करणार्या झाडांच्या फांद्या तोडून घेण्यात आलेल्या आहेत. शहराच्या विविध भागात रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्याची कार्यवाही केली असून अनाधिकृत बोर्ड, बॅनर, फलकही काढून टाकण्यात आलेले आहेत. प्रीतिसंगम घाटावर नदीपात्राजवळील श्री विसर्जनासाठी जाण्याचा रस्त्यावर जेसीबीच्या सहाय्याने सपाटीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे हा मार्ग विसर्जन मिरवणुकीसाठी सुरक्षित बनला आहे.
बोट, रूग्णवाहिकांची व्यवस्था...
गणेश मुर्ती विसर्जनाकरीता नागरिकांची सुरक्षिता व संरक्षणाकरीता प्रीतिसंगम घाटावर व बागेत आणि परिसरात सर्प, किटक व सरपटणारे प्राणी यांच्यापासून संरक्षणासाठी सर्पमित्र, पोहणारे व्यक्तींचे पथक, कॉटेज हॉस्पिटलकडील पथक आणि नगरपरिषदेकडील बोट व रुग्णवाहीकेची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
22 ठिकाणी जलकुंड...
पर्यावरण पूरक श्री उत्सव पार पाडणेसाठी शहराच्या विविध भागात 22 जलकुंडे उभारण्यात आलेली आहेत. तेथे कर्मचार्यांच्या नियुक्ती केलेली आहे. सदरील जलकुंडात मूर्तीचे जास्तीत जास्त विसर्जन व्हावे यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. जलकुंडात मूर्ती विसर्जन केल्यानंतर नागरिकांना नगरपरिषदेतर्फे व नेचर क्लब यांच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.