

कराड : सैदापूर (ता. कराड) परिसरात सुमारे १४.८२ किलो गांजा जप्त केल्यानंतर तस्करीप्रकरणी आंतरराज्य टोळी कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावरून कराड शहर पोलिसांनी सांगोलासह (जि. सोलापूर) साताऱ्याच्या पाटण तालुक्यात छापा टाकत सहा संशयितांना गजाआड केले.
गोरख जिजाबाई पवार (वय ५६, रा. कराड), शुभम अनिल पानसकर (२९), सोहम अशोक जाधव (३६, दोघेही रा. मल्हारपेठ, ता. पाटण), रजाक उस्मान कच्ची (५८, रा. कराड), बिरा ऊर्फ महाराज अंतू मासाळ (४३, रा. गोनेवाडी, ता. मंगळवेढा), रामेश्वर बिरा लोखंडे (२७, रा. गोनेवाडी, ता. मंगळवेडा) आणि शरद भावुसाहेब पवार (२७, रा. वाकीघेर्डी, ता. सांगोला) यांचा समावेश आहे.
गोरख पवारकडून गांजा हस्तगत केल्यानंतर चौकशीतून गांजा तस्करीचे आंतरराज्य रॅकेट कार्यरत असल्याची माहिती समोर आली. गांजा मोठ्या प्रमाणावर बाहेरून कराडमध्ये आणला जात असल्याचे चौकशीतून समोर आले आहे. पोलिस उपअधीक्षक राजश्री पाटील, पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक अशोक भापकर यांनी मंगळवेढा आणि सांगोला तालुक्यांत छापे टाकले. या छाप्यांत संशयितांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले असून संशयितांकडे कसून चौकशी सुरू आहे.
तत्पूर्वी, गोरख पवार याच्याकडून १४.०८२ किलो गांजा व अन्य साहित्य असा एकूण ३ लाख ९९ हजार १७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. या कारवाईत अशोक भापकर यांच्यासह पोलिस हवालदार असिफ जमादार, प्रवीण पवार, सागर बर्गे, दीपक कोळी, मयूर देशमुख, हर्षल साळुंखे, महेश शिंदे व महेश पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
आणखी संशयितांच्या सहभागाची शक्यता
कराड शहरासह तालुक्यात यापूर्वीही गांजा जप्त करण्यात पोलिसांना यश मिळाले होते. मात्र, आता चौकशीतून गांजापुरवठा करणारे रॅकेटच समोर आले आहे. केवळ कराडच नव्हे, तर राज्यातील अन्य ठिकाणीही या रॅकेटची पाळेमुळे असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच, या रॅकेटमध्ये आणखी काही संशयितांचा सहभाग असण्याची शक्यता आहे.