

कराड : पुणे–बंगळूर महामार्गाच्या सहापदरीकरणांतर्गत कराडजवळ उभारण्यात येत असलेल्या नवीन उड्डाण पुलाचे काम 20 जूनपर्यंत पूर्ण करून साताराकडून कोल्हापूरकडे जाणारी लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, उड्डाण पुलावरील अनेक महत्त्वाची कामे अद्याप अपूर्णच आहेत. दरम्यान, आयआरसीकडून पुलावर वाहतुकीसाठी धोका ठरणारी सर्व कामे पूर्ण झाल्याशिवाय पूल वाहतुकीसाठी खुला न करण्याची सक्त सूचना केली आहे.
यापूर्वी 17 जून 2025, त्यानंतर नोव्हेंबर 2025 आणि मार्च 2026 अशा तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा 20 जून 2026 ही अंतिम तारीख जाहीर करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती 'पहिले पाढे पंचावन्न' अशीच कायम आहे. नांदलापूर येथे उड्डाणपुलाला जोडणाऱ्या भुयारी मार्गाचे रुंदीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही. अप्रोच मार्गावरील दुभाजकाचे काम रखडले असून पुलावरील अनेक ठिकाणी दुभाजक अपूर्ण आहेत. कामासाठी वापरलेल्या लोखंडी सळ्या उघड्यावर असल्याने सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कोल्हापूरकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या लेनवरील संरक्षक कठड्यांचे रंगकामही बाकी आहे.
याशिवाय उड्डाण पुलावर एकही दिशादर्शक किंवा सूचनाफलक बसविण्यात आलेला नाही. कृष्णा हॉस्पिटल परिसरापुढील भागात रस्त्यावरील प्रकाशयोजनेचे काम अपूर्ण असून आता पोल उभारण्यास सुरुवात झाली आहे. पुलावरील पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्थाही पूर्ण नसल्याने मुसळधार पावसात पाणी थेट खालील मार्गावरील वाहनांवर कोसळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान, अपूर्ण कामांमुळे कराड परिसरात दररोज वाहतूक कोंडी होत असून हजारो वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वारंवार दिलेल्या मुदत वाढीमुळे महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार कंपनीच्या नियोजनावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.