

कराड : कराड-ढेबेवाडी मार्गावर कुसूर गावच्या हद्दीत भरधाव दुचाकी दुभाजकाला धडकल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास हा अपघात घडला.
कमलेशकुमार सिबार कोल (वय २५, मूळ रा. उपरवली, ता. सिधी, जि. सिलावर) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कमलेशकुमार हा शनिवारी सकाळी दुचाकीवरून कराड-ढेबेवाडी मार्गावरून तळमावलेहून कोळेच्या दिशेने कामासाठी निघाला होता. सकाळी ८.२० च्या सुमारास कुसूर गावच्या हद्दीत दुचाकी दुभाजकास धडक दिली.
यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला रुग्णालयात हलवले. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. अपघाताची नोंद कराड तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे.