

कराड : सैदापूर -विद्यानगर ता. कराड येथील कराड -कोरेगाव राज्य मार्गावरील मुख्य रस्त्यावर स्टॉलधारकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करत राजरोसपणे व्यवसाय थाटले आहेत. रस्त्याच्या बाजूकडील गाळेधारकांनी देखील अतिक्रमण केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सैदापूर ग्रामपंचायतीने याची गंभीर दखल घेतली असून सैदापूर ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये सैदापूर- विद्यानगर मधील अतिक्रमणे काढण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
सैदापूर ग्रामपंचायतीने संबंधित दुकानमालकांना नोटीसा बजावल्या आहेत. 70 स्टॉलधारक व 12 गाळेधारकांना 7 दिवसात अतिक्रमण काढून घेण्याची मुदत देण्यात आली आहे.सैदापूर -विद्यानगर परिसरामध्ये अनेक महाविद्यालये व शाळा तसेच मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती आहे. हजारो विद्यार्थी रोज शाळा, कॉलेजसाठी येथे ये -जा करत असतात. नोकरदार मंडळींनी याच परिसरात वास्तव्य वाढविले आहे. विद्यार्थ्यांची वाढती संख्या आणि विस्तारलेली नागरी वस्ती यामुळे विद्यानगर परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढली आहेत.
रस्त्याच्या दुतर्फा हॉटेल्स, मोबाईल शॉपी, मेडिकल्स, कपड्याची दकाने, खाद्यपदार्थांचे स्टॉल लागले आहेत. फुटपाथ देखील बंद करून या ठिकाणी बेकायदेशीररित्या अनेकांनी व्यवसाय उभे केले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी करून देखील अतिक्रमण काढले जात नव्हते. मात्र आता ग्रामपंचायतीने याबाबत ठराव करून सर्व अतिक्रमणे काढण्याचा निर्णय घेतला आहे. बांधकाम विभागानेही याला प्रतिसाद दिला आहे. पुढील सात दिवसात अतिक्रमणे काढून घेण्याबाबत संबंधितांना ग्रामपंचायतीकडून नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.