

सातारा : आठवीच्या अभ्यासक्रमातून मराठा साम्राजाचा नकाशा वगळणे, हा अतिशय गंभीर प्रकार आहे. नकाशा पुसला जातो, ही अतिशय धोक्याची घंटा आहे. अशा घटनांनी बघता बघता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासावर पडदा पडू शकतो आणि तोच प्रयत्न चालू आहे, असे मला वाटते. हे खपवून घेणार नाही, अशी तंबी राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले यांनी दिली.
जलमंदिर निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी त्या बोलत होत्या. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) कडून मराठा साम्राज्याचा नकाशा आठवीच्या अभ्यासक्रमातून वगळला असल्याच्या प्रश्नावर बोलताना राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले यांनी परखड शब्दांत आपली भूमिका स्पष्ट केली.
त्या म्हणाल्या, याबाबत प्रसारमाध्यमांनी आवाज उठवला पाहिजे. हा प्रश्न उचलून धरला पाहिजे. सगळ्यांच्या नसानसामध्ये, अंगा अंगामध्ये, हृदयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज विराजमान झाले असून त्याला तुम्ही हात लावू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार कोणी मांडताना दिसत नाही. आपण हिंदू आहोत, हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळेच. आपण शिवरायांचे मोल कधीच करू शकत नाही. छत्रपती उपाधी लोकांच्यासाठी व समाजासाठी त्यांनी जोपासली.
छ. शिवाजी महाराज हे एक युगपुरुष होते. त्यांच्यावर संपूर्ण जगभरात संशोधन सुरू आहे. अल्प आयुष्यामध्ये त्यांनी प्रचंड यश कमावले आहे. जोपर्यंत पृथ्वी आहे, जोपर्यंत सूर्य, चंद्र आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव तेवतच राहील, असेही राजमातांनी स्पष्ट केले.
छत्रपती शिवरायांनी ज्याप्रमाणे शिक्षा दिल्या त्या पद्धतीने शिक्षा देण्याची गरज
राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले म्हणाल्या, सद्यस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार कोणी मांडताना दिसत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी अन्याय, अत्याचार करणाऱ्यांना ज्या प्रकारे शिक्षा दिल्या त्यापद्धतीने शिक्षा दिल्या तर अशा घटना घडणार नाहीत, अशा शब्दांत राजमातांनी आपला संताप व्यक्त केला.