Satara News : कास पुष्प‍ पठारावर 'ओपन मटका'

पर्यटनस्थळावरच टेबल टाकून जुगार : पर्यटकांमध्ये संताप
Satara News
कास पुष्प‍ पठारावर 'ओपन मटका'
Published on
Updated on

सातारा : जागतिक वारसास्थळ म्हणून लौकिक मिळवलेल्या कास पठारावर सध्या निसर्गाचे मनोहारी रूप पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, याच पर्यटनस्थळाच्या परिसरात 'ओपन मटका'चा सर्रास खेळ सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे. डोंगरावर खुशाल टेबल टाकून मटक्याचे आकडे घेतले जात असल्याचा आरोप खुलेआम होवू लागला आहे. त्यामुळे कासच्या पर्यटनाला जुगाराच्या विळख्याचे ग्रहण लागले आहे. या प्रकाराकडे पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने पर्यटकांमधून संताप व्यक्त होत आहे.

पावसाळ्यात कास पठार परिसरातील धबधबे, हिरवाई आणि फुलांचे बहरलेले सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करत आहे. सुटीच्या दिवशी तर पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, या गर्दीचा फायदा घेत काही जणांकडून उघडपणे मटका चालवला जात असल्याचे दिसून येत आहे. डोंगराच्या परिसरात टेबल मांडून मटक्याचे आकडे घेण्याचा प्रकार सुरू असल्याचे स्थानिक उघडपणे दाखवत आहेत. काससारख्या संवेदनशील पर्यटनस्थळावर पर्यटकांच्या सुरक्षिततेबरोबरच कायदा व सुव्यवस्था राखणे आवश्यक असताना जुगाराचा प्रकार खुलेआम सुरू राहणे ही गंभीर बाब असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

पोलिसांची नजर चुकवून नव्हे, तर पर्यटकांच्या वर्दळीच्या ठिकाणीच हा प्रकार सुरू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे 'ओपन मटका'वाल्यांना कोणाचे अभय आहे? असा सवाल पर्यटकांकडून उपस्थित केला जात आहे. कास पठाराची ओळख जगभरात निसर्गसौंदर्यामुळे आहे. मात्र, अशा प्रकारांमुळे पर्यटनस्थळाची प्रतिमा मलिन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने कास पठार परिसरात तातडीने गस्त वाढवून ओपन मटका चालविणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पर्यटक व स्थानिकांकडून होत आहे.

'कास'च्या सौंदर्याला डाग

निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना कासवर जुगाराचे प्रकार दिसत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. यामुळे कासच्‍या सौंदर्यालाही डाग लागत आहे. पर्यटनस्थळावरील अशा गैरप्रकारांना वेळीच आळा घातला नाही, तर त्याचे गंभीर परिणाम पर्यटनाच्या दृष्टीने होऊ शकतात. यासाठी पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news