

सातारा: बैलांचा बेभान वेग, गाडामालकांचा उत्साह आणि शौकिनांचा जल्लोष... अशा चैतन्यमय वातावरणात घनवटवाडी (ता. माण) येथे बैलगाडा शर्यतीचा थरार अनुभवण्याठी आवश्यक आपली उपस्थिती राखून ठेवा. श्री ज्योतिर्लिंगाच्या ४२ व्या वार्षिक आनंदोत्सवानिमित्त रविवार (दि. १५ नोव्हेंबर) रोजी भव्य ‘ज्योतिबा केसरी’ बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ वाजल्यापासून ज्योतिबा केसरी मैदानावर या स्पर्धेचा थरार रंगणार आहे.
ग्रामीण संस्कृतीचा मानबिंदू आणि शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असलेल्या भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन ज्योतिबा केसरी मैदानावर करण्यात आलेले आहे. बैलगाडा शर्यत हा केवळ वेगाचा खेळ नसून शेतकरी आणि त्यांच्या बैलांमधील जिव्हाळ्याच्या नात्याचे दर्शन घडविणारा पारंपरिक खेळ असून आपल्या धन्याला विजय मिळवून देण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या बैलांचा वेग आणि गाडामालकांचा उत्साह पाहण्याची संधी या शर्यतीतून अनुभवण्यास मिळणार आहे.
शर्यतीच्या पहिल्या पर्वाला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे यंदाच्या दुसऱ्या पर्वाबाबत बैलगाडा शौकिनांमध्ये मोठी उत्सुकता आहे. राज्यभरातून नामवंत बैलजोड्या या स्पर्धेत सहभागी होणार असून, त्यांच्या वेगवान धावण्याचा थरार पाहण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन आयोजक ज्योतिबा यात्रा कमिटीच्या वतीने आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे.
या स्पर्धेस प्रमुख पाहुणे म्हणून ब्रह्मा दादा पैलवान (कुमठे) उपस्थित राहणार आहेत. शर्यतीचे मैदान पूर्णपणे सज्ज झाले असून, प्रेक्षकांच्या बसण्याची आणि पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय आयोजकांकडून करण्यात आली आहे. तसेच, शासनाच्या सर्व नियमांचे आणि बैलजोड्यांच्या सुरक्षेचे काटेकोर पालन केले जाणार आहे. तरी सर्व शर्यत प्रेमींनी आणि ग्रामस्थांनी या ऐतिहासिक सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बैलगाडा शर्यतीचा थरार अनुभवावा, असे आवाहन ज्योतिबा यात्रा कमिटी, घनवटवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.